नांदेड-पनवेल रेल्वे आता 21 डब्यांची

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

21 मे पासून चार स्लिपर कोच वाढणार

21 मे पासून चार स्लिपर कोच वाढणार
परळी वैजनाथ - दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड-पनवेल-नांदेड (गाडी क्रमांक 17613/14) या रेल्वेच्या बोगी संख्येत वाढ करण्यात आली असून 21 मे पासून चार द्वितीयश्रेणी म्हणजेच स्लिपरकोच वाढविण्यात आल्या आहेत. या गाडीला आता एकूण 21 डबे असतील. प्रवाशांची वाढती संख्या, वाढत चाललेले आरक्षण लक्षात घेऊन बोगी संख्या वाढविल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.

परळी वैजनाथ रेल्वेस्थानक मार्गे धावणाऱ्या नांदेड-पनवेल (17613) व पनवेल-नांदेड (17614) या रेल्वेला चार डबे आणखी जोडण्यात आले आहेत. नांदेड पनवेल आठवड्यातून सहा दिवस धावणारी एक्‍स्प्रेस असून, या गाडीला प्रवाशांतून होणारे सर्वाधिक आरक्षण आणि गर्दी लक्षात घेऊन कायमस्वरूपी चार स्लिपरकोच वाढविण्यात आल्या आहेत. आता ही गाडी एकूण 21 डब्यांची असून, यामध्ये एक द्वितीयश्रेणी वातानुकूलित, एक तृतीयश्रेणी वातानुकूलित, आठ द्वितीयश्रेणी स्लिपरकोच, नऊ साधारण व दोन एसएलआर असे एकूण 21 डबे असतील. 21 मे पासून नांदेड, तर 22 मे पासून पनवेल येथून नव्या डब्यांची भर पडणार आहे.

दरम्यान, परळीमार्गे आठवड्यातून 6 दिवस धावणाऱ्या नांदेड-पनवेल-नांदेड या रेल्वेला होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन डबे वाढविण्याचा दक्षिण मध्य रेल्वेने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे परळी रेल्वे संघर्ष समितीचे निमंत्रक मोहनलाल बियाणी यांनी सांगितले.

नांदेडपासून या मार्गावर असलेल्या विविध शहरांचा पनवेल, पुणे आदी शहरांशी मोठा संपर्क असून शिक्षण, तसेच उद्योग, व्यवसायामुळे या मार्गावरील गावांकडे जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी होत होती. संघर्ष समितीने यापूर्वीही डबे वाढविण्याची सूचना केली होती. हा निर्णय स्वागतार्ह असून, प्रवाशांना तिकीट काढतानाच ते कन्फर्म मिळेल.