मतदारांचा प्रताप' की विजयाची परंपरा अमर !

मतदारांचा प्रताप' की विजयाची परंपरा अमर !

नांदेड - नांदेडच्या राजकारणात अशोक चव्हाण विरुद्ध सर्व विरोधक एकत्र असेच आत्तापर्यंत घडत आले आहे. त्यात कधी अशोकरावांची तर कधी विरोधकांची सरशी झाली आहे. आता पुन्हा एकदा नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्याने नांदेडकरांना हा सामना पहायला मिळाला असून त्यात कोण "बाजी' मारणार, याचा फैसला मंगळवारी (ता. 22) होणार आहे. नांदेडकरांना मतदारांचा "प्रताप' पहायला मिळणार की पुन्हा विजयाची परंपरा अमर राहणार, हे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्यात वर्चस्व असले तरी गेल्या दोन वर्षात सत्तेत बदल झाल्यामुळे हळू हळू त्यांची जिल्ह्यावरील पकड कमी होत चालली आहे. नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्याने विरोधकांनी ही संधी साधून सुरवातीपासूनच प्रयत्न केले आणि विरोधकांची एकत्र मोट बांधत तोडीस तोड उमेदवार देण्याचा प्रयत्न माजी सनदी अधिकारी श्‍यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून झाला आहे. शिवसेना, भाजपासह राष्ट्रवादीलाही हा उमेदवार मान्य आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचे विद्यमान आमदार आणि चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अमर राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आली. दोघांमध्ये सरळ लढतीचे चित्र तयार झाले आणि निवडणुकीचा प्रचार मतदारांपर्यंत सुरू झाला.

विधान परिषदेसाठी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांपर्यंत पोहचणे तसे दोन्ही उमेदवारांना अवघड नव्हते. सर्वांत जास्त मतदार कॉंग्रेसचे असले तरी दगा - फटका होऊ नये, याची खबरदारी सत्ताधाऱ्यांनी घेतली. दुसरीकडे विरोधक एकत्र झाल्याने त्यांचीही ताकद वाढली होती आणि त्यातच सत्ताधाऱ्यांमधील काही जण गळाला लागल्याने निवडणूक चुरशीची होत गेली. कॉंग्रेसचे मतदार सर्वाधिक असले तरी त्यांच्यासह इतर विरोधकांची मते आपल्याकडे वळविण्यासाठी अपक्ष उमेदवार शिंदे यांनी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. त्यांना आमदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, सुभाष साबणे, नागेश पाटील आष्टीकर, डॉ. तुषार राठोड, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर, ओमप्रकाश पोकर्णा आदींचे मोठे सहकार्य मिळाले.

कॉंग्रेसमधला एक गट जसा विरोधात गेला तसाच एमआयएम, भाजप आणि राष्ट्रवादीमधील एक गट कॉंग्रेससोबत असल्याचा दावा करण्यात आला. त्याचबरोबर काही मतदारांनी दोन्ही उमेदवारांना आम्ही तुमचेच असा विश्वास दिल्यामुळे निवडणुकीत रंगत भरली. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच राष्ट्रवादीने देखील विशेष लक्ष दिल्यामुळे नांदेडची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली. नांदेडचा सात बारा मालकीचा पासून ते नांदेडकर जनतेचीच खरी मालकी असल्यापर्यंत आरोप आणि त्यास प्रत्युत्तर देण्यापर्यंतचा सामना रंगला.

विधानपरिषद निवडणुकीसाठी शनिवारी मतदानाचा टप्पा सुरळीत पार पडल्यानंतर आता दोन्हीही उमेदवारांकडून विजयाचा दावा करण्यात आला असून या निवडणुकीचा निकाल नांदेड जिल्ह्याच्या आगामी राजकारणावर परिणाम करणारा ठरणार आहे.

विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी नांदेड शहरासह जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर 99.79 टक्के मतदान झाले. एकूण 472 पैकी 471 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कॉंग्रेसतर्फे अमर राजूरकर तर अपक्ष म्हणून माजी सनदी अधिकारी श्‍यामसुंदर शिंदे हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दोघांनीही आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला असून येत्या मंगळवारी सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात मतमोजणी होणार आहे.

धनशक्ती विरुद्ध लढा - अमर राजूरकर
कॉंग्रेसचे उमेदवार अमर राजूरकर म्हणाले की, या निवडणुकीत आपला विजय होणार असून धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हा विजय राहणार आहे. आपण पराभूत व्हावे, म्हणून सर्व विरोधक एकत्र आले असले तरी नांदेड जिल्ह्यातील मतदार मात्र विकासाच्या बाजूनेच राहत असल्यामुळे विजय माझाच राहणार आहे.

विजय आमचाच - श्‍यामसुंदर शिंदे
अपक्ष उमेदवार श्‍यामसुंदर शिंदे म्हणाले की, नांदेड विधान परिषद निवडणुकीत आमचाच विजय होणार आहे. नेहमीप्रमाणे कॉंग्रेस फूट पाडण्याचा प्रयत्न करते. मात्र यंदा सर्व विरोधक एकत्र आल्याने आणि मला पाठिंबा दिल्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे. नांदेडचा निकाल हा आगळा - वेगळा आणि राज्यात परिवर्तनाची नांदी ठरणारा असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com