नांदेडला काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

नांदेडला काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी येऊ शकतात एकत्र!

नांदेड- जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा त्रिशंकु स्थिती निर्माण झाली असून कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा सर्वात जास्त जागा पटकाविल्या आहेत. दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला जवळपास सारख्याच जागा मिळाल्या आहेत. एक जागा राष्ट्रीय समाज पक्षाला तर एका जागेवर अपक्ष निवडून आला आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती अखेर बहुमताच्या जवळ जाण्यात काँग्रेसला यश मिळाले अाहे. आता काँग्रेसही राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता स्थापन करु शकते तर दुसरीकडे काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अशी परिस्थिती आहे.
नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा कुणाचीही युती किंवा आघाडी झाली नव्हती. सगळेच जण स्वबळावर लढले होते. यंदाची निवडणुक बहुरंगी झाली होती त्यामुळे कोण निवडून येणार, याचा अंदाज बांधणे कठीण झाले होते. अखेर मतमोजणीच्या दिवशी त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे. कॉग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. मात्र बहुमताचा ३३ जागेचा आकडा त्यांना गाठण्यात अपयश आले आहे.
 
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्या सभा घेतल्यामुळे भाजपा मागील वेळेस चार जागावरून आता १३ वर गेला आहे. राष्ट्रवादीला मागील वेळेस १८ जागा होत्या आता दहा जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला नऊ जागा होता आता एकने वाढ होऊन दहा मिळाल्या आहेत. काँग्रेसला २५ जागा होता आता त्या तीनने वाढून २८ झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशिलकुमार शिंदे यांनी शेवटच्या टप्यात हेलीकॅप्टरने फिरून जिल्ह्यात सभा घेतल्या आणि केळीच्या पानावर केलेले जेवण अखेर मदतीला आले असेच म्हणावे लागेल. सोलापूर जिल्ह्यात सुशिलकुमार शिंदेचा फायदा झाला नसला तरी नांदेडमध्ये मात्र झाल्याचे चित्र आहे.

तीन माजी अध्यक्ष पराभूत
जिल्हा परिषदेचे तीन माजी अध्यक्ष पराभूत झाले असून त्यामध्ये बाबाराव एंबडवार (शिवसेना), वैशाली चव्हाण (काँग्रेस) आणि जनाबाई डुडुळे (शिवसेना) यांचा समावेश आहे. राष्ट्रीय समाज पक्षाकडून दशरथ लोहबंदे हे फुलवळ (ता. कंधार) येथून निवडून आले आहेत तर कुरुळा (ता. कंधार) येथून शोभा गोमारे या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. त्याचबरोबर शेवटच्या क्षणी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मोनाली पाटील बोरगावकर या सावरगाव (ता. लोहा) येथून निवडून आल्या आहेत. विद्यमान सदस्य लक्ष्मण ठक्करवाड हे पुन्हा भाजपाकडून आरळी (ता. बिलोली) येथून निवडून आले आहेत. विद्यमान सदस्या मंगाराणी अंबुलगेकर या बाऱ्हाळीतून (ता. मुखेड) काँग्रेसकडून निवडून आल्या आहेत. शेवटच्या क्षणी भाजपात आलेले चंद्रसेन पाटील हे माळाकोळी (ता. लोहा) येथून निवडून आले आहेत. शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता बबन बारसे याला अखेर गुलाल लागला असून तो येळेगाव (ता. अर्धापूर) येथून निवडून आला आहे तर शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते ज्योतिबा खराटे यांना वाई बाजार (ता. माहूर) येथून पराभूत व्हावे लागले आहे. माजी सभापती प्रकाश देशमुख भोसीकर हे काॅंग्रेसकडून भोसी (ता. भोकर) येथून निवडून आले आहेत. विद्यमान शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे हे काँग्रेसकडून (लोहगाव, ता. बिलोली) निवडून आले आहेत. ज्येष्ठ नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी भाजपकडून (मरखेल, ता. देगलूर) विजय मिळविला आहे.

नातेवाईक विजयी
शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर (शिराढोण, ता. कंधार), मुलगी प्रणिता देवरे चिखलीकर (वडेपुरी, ता. लोहा) हे दोघेही विजयी झाले आहेत. मात्र त्यांचा पुतण्या सचिन पाटील चिखलीकर कौठा (ता. कंधार) पराभूत झाला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकर धोंडगे यांचा पुतण्या विजय धोंडगे कौठा (ता. कंधार) निवडून आला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सूनबाई डॉ. मीनल पाटील खतगावकर या रामतीर्थ (ता. बिलोली) निवडून आल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गंगाधरराव कुंटुरकर यांच्या सूनबाई मधुमती देशमुख कुटुंरकर (कुटुंर, ता. नायगाव) याही विजयी झाल्या आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांच्या सूनबाई संध्या धोंडगे (बहादरपुरा, ता. कंधार) या भाजपकडून निवडून आल्या आहेत. काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या आई शांताबाई जवळगावकर या (दुधड, ता. हिमायतनगर) येथून निवडून आल्या आहेत. काँग्रेसचे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या सूनबाई आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्या वर्षा भोसीकर या (बहादरपुरा, ता. कंधार) पराभूत झाल्या आहेत. काँग्रेसचे माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांच्या पत्नी सुशिला बेटमोगरेकर (चांडोळा, ता. मुखेड) या निवडून आल्या आहेत. भाजपाचे युवा नेते राजेश पवार यांच्या पत्नी पूनम पवार (मांजरम, ता. नायगाव) निवडून आल्या आहेत. विद्यमान कृषि सभापती दिनकर दहिफळे यांच्या आई सुनंदा दहिफळे (बोधडी, ता. किनवट) या राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या आहेत. शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांच्या सूनबाई भाग्यश्री साबणे या (एकलारा, ता. मुखेड) निवडून आल्या आहेत. भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड यांचा पुतण्या संतोष राठोड जांब बुद्रुक (ता. मुखेड) येथून निवडून आले आहेत. माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचे पुत्र लक्ष्मण ठक्करवाड हे आरळी (ता. बिलोली) येथून भाजपाकडून निवडून आले आहेत.

नांदेड जिल्हा परिषद अंतिम निकाल
एकूण जागा - ६३,

कॉंग्रेस - २८,
भाजप - १३,
शिवसेना - १०,
राष्ट्रवादी - १०,
रासप - एक
अपक्ष - एक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com