नांदूरमध्ये ४४ हजार क्‍युसेक, जायकवाडीत मात्र ७ हजारच

नांदूरमध्ये ४४ हजार क्‍युसेक, जायकवाडीत मात्र ७ हजारच

औरंगाबाद - जायकवाडी धरणात सध्या ७ हजार ५६१ क्‍युसेकने पाणी येत आहे; मात्र जायकवाडीच्या वर असलेल्या नागमठाण बंधाऱ्यात १३ हजार ५२० क्‍युसेकने पाणी येत आहे. दारणा आणि पालखेड या नाशिक जिल्ह्यातील धरणांचे दरवाजे उघडले असून नांदूर-मधमेश्‍वर धरणात ४४ हजार ५४५ क्‍युसेकने पाणी येत आहे. नांदूर-मधमेश्‍वरच्या दोन्ही कालव्यांतून भरपावसाळ्यात पिण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागमठाणमध्ये येणारा प्रवाह कमी झाला आहे.

जायकवाडी धरणात जूनपासून ते आतापर्यंत ५१.२९७ दलघमी म्हणजेच १.८१ टीएमसी पाणी दाखल झाले आहे. जायकवाडीच्या मृतसाठ्यात आणखी २२० दलघमी म्हणजेच ८ टीएमसी पाणी आल्यावर मृतसाठ्यातून जिवंतसाठ्याकडे जायकवाडी जाईल. सध्या येणाऱ्या पाण्याचा प्रवाह असाच राहिला तर आणखी ५० दलघमीपर्यंत पाणी जायकवाडीत येऊ शकते, अशी अपेक्षा लाभक्षेत्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

गंगापूर धरण सध्या ५५ टक्‍के असले तरीही दारणा ६७ टक्‍के, तर पालखेड ९३ टक्‍के भरले आहे. त्यामुळे दारणा धरणातून ९ हजार १६४ क्‍युसेक आणि पालखेड धरणातून ३१ हजार ८०० क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे तेथून थेट पाणी हे नांदूर-मधमेश्‍वर धरणात येते. नांदूर-मधमेश्‍वर धरणात येणारे पाणी हे ४४ हजार ६४५ क्‍युसेक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी येत असतानाही पुढे नागमठाण बंधाऱ्यात केवळ १३ हजार ५२० क्‍युसेक पाणी येत आहे. ३१ हजार १२५ क्‍युसेक पाणी मध्येच मुरत आहे. कडाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचा शोध घेतला तेव्हा नांदूर-मधमेश्‍वर बंधाऱ्याच्या दोन्ही कालव्यांतून पिण्यासाठी म्हणून पाणी सोडले जात असल्याचे समजले. ज्या भागात पाणी कमी आहे त्या भागात पाणी वळविले जात असल्याची माहिती समोर येत आहे.

वैजापूर-गंगापूरमध्ये येणारा जलदगती कालवा बंदच
नांदूर-मधमेश्‍वर बंधाऱ्यातून दोन कालवे नाशिक व नगर जिल्ह्यात वळविले असले तरीही एक जलदगती कालवा हा वैजापूर आणि गंगापूरसाठी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जर दोन कालवे सोडण्यात आले तर हा जलदगती कालवाही वैजापूर, गंगापूर तालुक्‍यासाठी सोडण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दारणा, पालखेड धरणाचे दरवाजे उघडले
नांदूर-मधमेश्‍वरमध्ये ४४ हजार क्‍युसेकने पाणी
नागमठाण बंधाऱ्यात १३ हजार क्‍युसेकने पाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com