पुराने नारेगावात हाहाकार

औरंगाबाद - नारेगावात शनिवारी मध्यरात्री नाल्याला आलेल्या पुराने अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची उडालेली धावपळ.
औरंगाबाद - नारेगावात शनिवारी मध्यरात्री नाल्याला आलेल्या पुराने अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची उडालेली धावपळ.

औरंगाबाद - नारेगाव परिसरात शनिवारी (ता.२३) रात्री झालेल्या मुसळधार पावसात नाल्याला पूर आल्याने अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. अग्निशमन विभाग, पोलिसांनी धाव घेत नागरिकांना सुरक्षितस्थळी फंक्‍शन हॉल येथे हलविले. रात्री उशिरापर्यंत जेसीबीच्या मदतीने पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे काम सुरू होते. 

शहरासह नारेगाव परिसरात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे १०.३० वाजेच्या सुमारास नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला. पाहता-पाहता पाणी अजीज कॉलनीसह इतर भागांमधील घरांमध्ये शिरले. त्यामुळे नागरिकांची धावपळ सुरू झाली. पोलिस, अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. पोलिसांनी नारेगावात धाव घेऊन शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. पाऊस थांबल्याने रात्री एक वाजेनंतर पाणी ओसरत असल्याचे नगरसेवक गोकुळसिंग मलके यांनी सांगितले. चौका घाटाजवळ बंधारा फुटल्यामुळे पूर आल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठवाड्यात १७ मंडळांत अतिवृष्टी
नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांच्या काही भागांना शुक्रवारी (ता. २२) रात्री पावसाने झोडपून काढले. सतरा मंडळांत अतिवृष्टीची नोद झाली. हिंगोली जिल्ह्यात पुरात युवती वाहून गेली असून, तिचा शोध सुरू आहे. उमरगा जलमय होऊन मोठे नुकसान झाले. औरंगाबाद, बीड, लातूर, जालन्याच्या काही भागांत आज सरी कोसळल्या.

नांदेड जिल्ह्यात जोर
नांदेड - जिल्ह्यातील सात मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. कंधारमधील बारूळमध्ये १४०, उस्माननगर ११०, कुरळा ७२, मुदखेड तालुक्‍यातील मुगट ९१, धर्माबाद ७५, लोहा तालुक्‍यातील कापशी १०३, हदगाव तालुक्‍यातील पिंपरखेड मंडळात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने तेथे अतिवृष्टीची नोंद झाली. आज सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात सरासरी २४.५६ मिलिमीटर पाऊस झाला. 

पुरात युवती वाहून गेली
हिंगोली - जिल्ह्यास पावसाने झोडपून काढले. औंढा तालुक्‍यातील येहळेगाव (१५२ मि.मी.) तर वसमत तालुक्‍यातील हट्टा मंडळात (१३४ मि.मी.) अतिवृष्टीची नोंद झाली. हट्टा-सावंगी रस्त्यावरील घामोडा नाल्याच्या पुरामुळे काही काळ तीन गावांचा संपर्क तुटला होता. लोहगाव (ता. हिंगोली) येथील धुरपता रामा बोडखे (वय १८) ही ओढ्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेली. तिचा शोध सुरू आहे. हिंगोली शहरातून जाणाऱ्या कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे पुलावर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला. याच नदीच्या पुरामुळे डोंगरगाव पूल (ता. कळमनुरी) येथे पुलाजवळचे मंदिर पाण्यात बुडाले होते. जांभरूण रोडगे (ता. सेनगाव) गावाजवळच्या ओढ्याचे पाणी गावात शिरले. 

परभणी जिल्ह्यात दमदार
परभणी - जिल्ह्यात सर्वच तालुक्‍यांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. पूर्णा तालुक्‍यात ५२ मिलिमीटर पाऊस झाला. आज सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १५.२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पालमजवळील लेंडी नदीच्या पुलावरून पाणी वाहिल्याने नदीपलीकडील आरखेड, सोमेश्वर, उमरथडी, सायाळ, फळा, घोडा आदी गावांचा संपर्क काही काळ तुटला होता.

पेरण्यांना चालना
लातूर - जिल्ह्यात पाच दिवसांपासून सलग पाऊस सुरू असल्याने खोळंबलेल्या पेरण्यांना चालना मिळत आहे. काल रात्रीच्या पावसाने पाच मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मंडळे, कंसात मिलिमीटरमध्ये पाऊस ः हेर (ता. उदगीर) - १४७. वाढवणा (१००), खंडाळी (ता. अहमदपूर) - १२६, झरी (ता. चाकूर) - १२०, हिसामाबाद (ता. शिरूर अनंतपाळ) - १०४, साकोळ - ११०. आज दुपारपासून शहरासह जिल्हाभरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. 

दरम्यान, बीड जिल्ह्यात चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच असून बीड, अंबाजोगाई, केज, नेकनूर, परळी वैजनाथ भागांत आज जोरदार सरी कोसळल्या. जालना शहरासह अंबड, घनसावंगी, मंठा, भोकरदन, तळणी, राणीउंचेगाव, वाटूर, वालसावंगी आदी ठिकाणी आज सकाळी रिमझिम झाली. औरंगाबाद शहरातही दुपारी आणि रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. फुलंब्रीमध्ये मात्र जोरदार सरी बरसल्याने काही दुकानांत पाणी शिरले.

उमरगा जलमय
उमरगा - अतिवृष्टीने संपूर्ण शहर जलमय झाले. सुमारे अडीचशे घरांत पाणी घुसले. उमरगा, मुळज, नारंगवाडी महसूल मंडळांत ढगफुटीसदृश स्थितीने शेतीचे मोठे नुकसान झाले. पावसाचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर थांबल्याने रात्री दोननंतर दोन तास वाहतूक ठप्प होती. पळसगाव शिवारातील पाझर तलाव फुटल्याने सुमारे ३६ एकर क्षेत्रांतील माती, पिके वाहून गेली.

मंडळनिहाय मिलिमीटरमध्ये पाऊस - उमरगा १४६, मुरूम १९, दाळिंब २४, मुळज १४५, नारंगवाडी ११५.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com