नाथषष्ठीच्या सोहळ्याने दुमदुमते पैठणनगरी

गजानन आवारे
शनिवार, 18 मार्च 2017

जायकवाडी - शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी वर्ष 1599 च्या फाल्गुन वद्य षष्ठीला दुपारी बाराच्या माध्यान्ही हजारो भाविकांच्या साक्षीने पैठण येथील कृष्णकमल तीर्थावर, गोदावरी नदीत समाधी घेतली. त्यानंतर भक्तांनी दरवर्षी एकत्र येऊन वार्षिक उत्सव म्हणून नाथषष्ठी साजरा करण्याचा संकल्प केला. तेव्हापासून पैठणला नाथष्ठीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. तीन दिवस वेगवेगळ्या पारंपरिक कार्यक्रमांनी हा उत्सव साजरा होतो आणि पैठण नाथांच्या गजराने दुमदुमते. यंदाच्या उत्सव शनिवारपासून (ता. 18) सुरू होत असून, गेल्या काही दिवसांपासून नाथनगरीत भाविकांची मोठी वर्दळ सुरू आहे.

नाथांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास आठ ते दहा लाख भाविक कोणताही निरोप न देता, श्रद्धेने, भक्तिभावाने येतात. "भानुदास एकनाथ'चा गरजर करीत ठिकठिकाणांहून सुमारे पाचशेपेक्षा जास्त संत-महंत व महाराजांच्या दिंड्या नाथनगरीत दाखल होतात. दिंड्यांतून येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या सुमारे चार ते पाच लाख असते. नाथांनी समाधी घेतल्याच्या घटनेला शनिवारी (18 मार्च) 418 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे यंदा भाविकांची आणखी गर्दी होण्याची शक्‍यता आहे.

असा असतो उत्सव
पहिला दिवस - नाथांच्या पुण्यतिथीनिमित्त नाथषष्ठीला संत-महंत, महाराज दिंड्यांसह नाथ वाड्यातील विजयी पांडुरंगाचे दर्शन घेतील. नाथ समाधी मंदिरात पादुकांचे (चरण) दर्शन घेऊन नगर प्रदक्षिणा करतील. या वेळी "धन्य धन्य एकनाथा, तुमच्या चरणी माझा माथा' आदी अभंग म्हणून पैठणनगरी दुमदुमून जाईल. नाथवंशजांची पहिली दिंडी दुपारी बाराच्या सुमारास नाथांच्या राहत्या वाड्यातून अभंग, "भानुदास एकनाथ'चा गजर करीत अमृतराय महाराज, उदासीबुवा महाराज मठ, वाळवंट येथून गोदावरी पश्‍चिमद्वाराने बाहेरील समाधी मंदिरात दाखल होईल. तेथे गाभाऱ्यात समाधीसमोर परंपरेनुसार दोन कीर्तने होतील. पहिले कीर्तन वारकरी पद्धतीचे असेल. ते नाथवंशज प्रवीण महाराज गोसावी सादर करतील. दुसरे नारदीय पद्धतीचे कीर्तन नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी करतील. समाधीचे दर्शन घेऊन सर्व नाथवंशज गडकरी, फडकरी, मानकरी, वारकऱ्यांसमवेत दिंडी मार्गाने पुन्हा नाथवाड्यात जातील. तेथे आरतीने दिंडीची सांगता होईल.

दुसरा दिवस - उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी फाल्गुन वद्य सप्तमीला (19 मार्च) मध्यरात्री नाथांच्या पादुकांची छबिना मिरवणूक निघेल. या प्रसंगी भारूड, गवळण, अभंग, रूपक आदींसह आरत्या होतील. सकाळी आठला नाथवाड्यात आरतीने मिरवणुकीची सांगता होईल.

तिसरा दिवस - उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी फाल्गुन वद्य अष्टमीला (20 मार्च) दुपारी चारला सर्व नाथवंशज भाविकांसह नाथांच्या वाड्यातील काल्याची दिंडी नाथ समाधी मंदिरात जाईल. तेथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत सूर्यास्तावेळी नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडली जाईल. प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता होईल. भगवान श्रीकृष्ण नाथांच्या घरी तब्बल बारा वर्षे "श्रीखंड्या' या नावाने राहिले. संत-महंत असे मोठ्या अभिमानाने सांगून त्यांनी ममता, समता आणि एकतेचा प्रत्यक्ष कृतीने संदेश दिल्यामुळे नाथषष्ठीला आगळेवेगळे महत्त्व आहे. "दहीहंडी' कार्यक्रमातून ते प्रतिबिंबित केले जाते.

कालाष्टमी सोहळ्याचा आनंद घेतल्यावर "शरण एकनाथा, पायी माथा ठेवीला, नका पाहू गुणदोष, झालो दास पायाचा' ही भावना मनामध्ये ठेवून भाविक पैठण नगरीचा निरोप घेतात.

नाथांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे पुत्र हरिपंडित यांनी "एकनाथषष्ठी' या नावाने उत्सव सुरू केला. या परंपरेला यंदा 418 वर्षे पूर्ण झाली आहेत. नाथवंशज म्हणून आमच्यासाठी ही एक आगळीवेगळी पर्वणीच आहे. आमच्या पदरात नाथांनी मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यानुसार नाथषष्ठी उत्सवाची परंपरा सर्व नाथवंशज पार पाडत आहोत.
- प्रवीण महाराज गोसावी, नाथवंशज, पैठण

Web Title: nathshasti sohala celebration