सुगावच्या राजेशने केली ‘निसर्ग लाईट’ची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

ग्रामीण भागात भारनियमनाला ठरू शकतो पर्याय - खर्चही कमी

नळेगाव - सुगाव (ता. चाकूर) येथील युवकाने ‘निसर्ग लाईट’ प्रयोगातून विजेला पर्याय शोधला असून, बाजारातील टेक्‍नॉलॉजीच्या साह्याने वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

ग्रामीण भागात भारनियमनाला ठरू शकतो पर्याय - खर्चही कमी

नळेगाव - सुगाव (ता. चाकूर) येथील युवकाने ‘निसर्ग लाईट’ प्रयोगातून विजेला पर्याय शोधला असून, बाजारातील टेक्‍नॉलॉजीच्या साह्याने वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

चाकूर तालुक्‍यातील ग्रामीण भागातील सुगाव येथील जवळपास दीड हजार उंबरठ्याच्या गावामध्ये एका गरीब कुटुंबातील राजेश नामदेव अर्जुने या तरुणाने निसर्ग लाईटची निर्मिती केली आहे. राजेशला शाळेत असल्यापासून इलेक्‍ट्रीक व इलेक्‍ट्रॉनिक क्षेत्राची आवड आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर इलेक्‍ट्रीक अभियंता बनण्याचे स्वप्न होते पण घरची आर्थिक परिस्थितीमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. राजेश काहीतरी नवीन करण्यासाठी सारखा धडपड करीत असे. ग्रामीण भागात विजेचा वापर वाढल्यामुळे भारनियमनाला सामोरे जावे लागते. सौरऊर्जेसारखीच आपणही निसर्गापासून वीज निर्माण करायची, असे ध्येय त्याने ठरवले. 

असा केला प्रयोग
वीजनिर्मितीसाठी एक पीव्हीसी पाईपचे तीन मीटर समांतर दोन भाग केले. ते पंख्याच्या पात्यांना जोडले. दोन्ही पाती सायकलच्या फिरत्या भागाला घट्ट बसविली. त्यासाठी सायकलच्या ॲक्‍सलचा वापर केला. 

ॲक्‍सल जमिनीवर शिडीद्वारे उभे करून घराच्या वर आलेल्या उभ्या व आडव्या पाईपला नट बोल्टने फिट बसवले जेणेकरून कापलेल्या पाईपला दिशा मिळून ते पवनचक्की सारखे फिरतील. असे बसविले पाते फिरण्यासाठी हवा नाही मिळाली तरी वीजनिर्मिती व्हावी म्हणून सौरऊर्जेची प्लेट बसविली आहे. या प्रयोगातून दहा बाय दहाच्या खोलीत चौदा वॅटच्या बल्ब इतका प्रकाश पडला. ही वीज टीव्ही, पंखा अशा उपकरणांसाठी वापरता येते. निसर्ग लाईट तयार करण्यासाठी कमी खर्च लागतो. प्रयोग करणेही सहज शक्‍य आहे. असा प्रयोग केला तर भारनियमनापासून सुटका मिळू शकते.

सामाजिक उपक्रमात सहभाग
सार्वजनिक जयंती उत्सव, परिसरातील शाळांमध्ये राजेश विद्यार्थ्यांना विजेचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण व संवर्धन याची माहिती, मोबाइल वापराची माहीती विनाशुल्क देतो. प्रत्येक सामाजिक कार्यात त्याचा सहभाग असतो.

घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अभियंता बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पण समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, यासाठी सामाजिक कार्यात सहभागी होतो. आपल्या जवळील ज्ञान जिल्हा परिषद शाळेतील गरिबांच्या मुलांना देतो. नवनवीन प्रयोग करण्यासाठी माझा भाऊ शरद व माझी पत्नी धनश्री मला सतत प्रोत्साहन देतात.
- राजेश नामदेव अर्जुने, सुगाव.

Web Title: natural light generate by rajesh arjune