राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद सोळंकेंकडे? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

बीड - नजरेच्या झोकात आलेला लाल दिवा हुकल्याने संतप्त झालेल्या प्रकाश सोळंकेंच्या गळ्यात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ घालून त्यांचा संताप कमी करण्याच्या हालचाली पक्षात सुरू आहेत. तसे सध्या पक्षात तुलनेने ते राजकीय ताकदवान आहेत. 

बीड - नजरेच्या झोकात आलेला लाल दिवा हुकल्याने संतप्त झालेल्या प्रकाश सोळंकेंच्या गळ्यात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ घालून त्यांचा संताप कमी करण्याच्या हालचाली पक्षात सुरू आहेत. तसे सध्या पक्षात तुलनेने ते राजकीय ताकदवान आहेत. 

भाजपच्या तुलनेत ताकद असलेल्या राष्ट्रवादीत एकमेकांवरील कुरघोड्या आणि एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील हस्तक्षेपामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत चांगली कामगिरी केलेली असतानाही पक्षाच्या हातून अध्यक्षपद गेले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व सुरेश धस यांच्या राजकीय कुरघोड्यांचा तोटा सोळंकेंना झाला. त्यामुळे संतप्त सोळंकेंनी धसांसह जयदत्त क्षीरसागर, अक्षय मुंदडा यांची पक्षातून हाकालपट्टीची मागणी केली आहे. यासाठी पक्षातून बाहेर पडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे; पण तसे तिघेही आपापल्या मतदारसंघातील ताकदवान नेते असल्याने तिघांची हाकालपट्टी करणे पक्षासाठीही अवघड आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची माळ घालून सोळंकेंचा राग कमी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या पक्षात तसे सोळंके राजकीय ताकदीत इतरांपेक्षा सरस आहेत. जिल्हा परिषदेत सर्वाधिक नऊ सदस्य जिंकून त्यांनी ताकद दाखवून दिली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वात सक्षम साखर कारखाना आणि माजलगाव बाजार समितीही त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी एकवेळा लोकसभा निवडणूक लढवल्याने जिल्हाभर त्यांचा संपर्क असून तीन वेळा ते आमदार आणि काही काळासाठी राज्यमंत्रीही राहिलेले आहेत.