नांदेड: दानवेंना काळे फासल्यास पाच लाख रुपये

जयपाल गायकवाड
शुक्रवार, 12 मे 2017

या सरकारला येणाऱ्या निवडणुकीत बळीराजा धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्यांना नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तोंडाला काळे फासल्यास पाच लाख रुपये बक्षिस आणि कंधार-लोहा मतदार संघात सहकुटूंब जाहीर सत्कार करू

नांदेड,:  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना नांदेड जिल्हातील जे कोणी तोंडाला काळे फासेल त्यांना लोहा-कंधार राष्ट्रवादी युवक काॅग्रेस कडून ५ लाखाचे बक्षिस देणार असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोंडगे यांनी जाहीर केले आहे.

"भाजप सरकारला सत्तेची मस्ती आली असून जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना अपशब्द वापरुन अपमान केला अाहे. एकीकडे शेतकऱ्यांचा कळवळा करायचा आणि दुसरीकडे अपमान करायचे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर होत आहे याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज असताना शेतकऱ्यांच्या विरोधात बोलत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सरकारची मनस्थिती नसल्यामुळे आता शेतकऱ्यांचा अपमान करीत आहेत. या सरकारला येणाऱ्या निवडणुकीत बळीराजा धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्यांना नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तोंडाला काळे फासल्यास पाच लाख रुपये बक्षिस आणि कंधार-लोहा मतदार संघात सहकुटूंब जाहीर सत्कार करू,'' असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे दिलीप धोंडगे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेतील पोस्टरमुळे चर्चा
जिल्हा परिषदेच्या परिसरात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या छायाचित्राची विटंबना केलेले बॅनर लाऊन शेतकऱ्यांवरील वक्तव्याचा निषेध केला. हे बॅनर लावल्याचे लक्षात येताच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ हे बॅनर हटवले. परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या फोटोची विटंबना केली असल्याची तक्रार मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच श्री.धोंडगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र या बॅनरवरुन जिल्हा परिषदेत चर्चा चांगलीच रंगली होती.

लोह्यात जोडो मारो आंदोलन
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरल्यामुळे कंधार-लोहा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी लोहा येथील शिवाजी चौकात प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या प्रतिमेस जोडे मारुन आंदोलन करण्यात आले तसेच शाही लावण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप धोंडगे, माजी सभापजी संजय कऱ्हाळे पाटील, शिवराज पाटील पवार, विलास घोरबांड, छत्रु महाराज स्वामी, जिवन पाटील वडजे, मधुकर शेंडगे, शंकर माने, बंटी सावंत, फुलाजी ताटे, मारोती कांबळे, संदिप पौळ, भाऊसाहेब सुरनकर, सुधाकर डांगे, पिंटु पांचाळ, गजानन कऱ्हाळे, सतिश चितळीकर आदी उपस्थित होते.