पुढील आठवड्यात ऑरिक हॉलचे भूमिपूजन 

पुढील आठवड्यात ऑरिक हॉलचे भूमिपूजन 

औरंगाबाद - "औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी'चा (ऑरिक) कारभार ज्या इमारतीतून चालणार आहे, त्या "ऑरिक हॉल'चे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता. नऊ) होणार आहे. "औरंगाबाद इंडस्ट्रीअल टाऊनशिप लि.'तर्फे (एआयटीएल) शापूरजी पालनजी कंपनीलाच या इमारतीचे काम सोपविण्यात आले आहे. त्यावर जवळपास 130 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये जगप्रसिद्ध कॅटरपिलर समूहाचा पर्किन्स इंडिया प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता.नऊ) सकाळी दहा वाजता होणार आहे. येथेच डीएमआयसीअंतर्गत ऑरिकची उभारणी केली जात असल्याने एआयटीएलने मुख्यमंत्री यांना ऑरिक हॉलच्या भूमिपूजनाची विनंती केली होती. मुख्यमंत्री यांनी त्यास होकार दर्शविला. साधारणतः सकाळी नऊ वाजता ऑरिक हॉलच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवला जाणार असून त्यानंतर मुख्यमंत्री येथील पायाभूत सुविधांच्या उभारणीची पाहणी करण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

शेंद्रा औद्योगिक पार्कमध्ये 50 एकर क्षेत्रावर "सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्‍ट' (सीबीडी) साकरण्यात येणार आहे. ऑरिक हॉल हा त्याचाच एक भाग असेल. अडीच लाख चौरस फूट एकूण बांधकाम क्षेत्रफळ असलेल्या "ऑरिक हॉल'चा वापर हा प्रशासकीय व व्यावसायिक इमारत म्हणून केला जाईल. येथून संपूर्ण ऑरिकचा कारभार चालविण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी होकार दर्शविल्यानंतर एआयटीएलतर्फे ऑरिक हॉलच्या भूमिपूजनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. निविदा प्रक्रियेनंतर प्रशासकीय कामकाज व परवानगींची पूर्तता करण्यात येत आहे. 

दोन वर्षांत उभा राहणार "ऑरिक हॉल' 
"आरेखन, बांधकाम आणि देखभाल' या तत्त्वावर "ऑरिक हॉल' उभारण्यात येणार आहे. इमारत उभारणीसाठी बिल्डींग 730 दिवसांची (दोन वर्षे) मुदत राहील. 25 हजार 84 चौरस मीटर एकूण क्षेत्रफळ असेल. ऑगस्ट महिन्यात या इमारतीच्या बांधकामाची निविदा निघाली होती. शेंद्रा औद्योगिक पार्कमधील पायाभूत सुविधांची कामे शापूरजी पालनजी कंपनीतर्फे केली जात आहे. या कंपनीनेही "ऑरिक हॉल'ची निविदा भरली होती. स्पर्धेअंती "एआयटीएल'तर्फे शापूरजी पालनजी कंपनीलाच ऑरिक हॉलचे कंत्राट देण्यात आले. जवळपास 130 कोटी रुपये या सहा मजली इमारतीवर खर्च केले जाणार आहेत. 

असा असेल ऑरिक हॉल 
एकात्मिक संचलन केंद्र म्हणून ही इमारत कार्यरत असेल. एकूण आठ मजले असतील. अंडरग्राउंड मजल्यावर पार्किंग आणि पाणी साठ्याच्या टाक्‍या, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, इलेक्‍ट्रिकल मॅकेनिकल वापरासाठीची कार्यालये असतील. ग्राउंड फ्लोअरवर मुख्य प्रांगण, प्रवेश दरवाजा, प्रतीक्षा कक्ष, उपाहारगृह, स्वयंपाकघर, सभागृह, बॅंक, एआयटीएलची मार्केटिंग टीमचे ऑफिस, मीटिंग रूम्स, परिषद कक्ष, उपनिबंधक कायार्लये, नागरी सुविधा केंद्र असेल. पहिल्या ते चौथ्या मजल्यावर विविध कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये असतील. हॉटेल्स आणि संबंधित सुविधांसाठीची जागा असेल. पाचव्या मजल्यावर वरिष्ठ व्यवस्थापन कार्यालय, अभियांत्रिकी आणि संबंधित कार्यालये असतील. साधारणतः 1800 ते 2000 कमर्चारी येथे काम करतील असा अंदाज आहे. बिबी-का-मकबरा आणि शहरातील इतर ऐतिहासीक वास्तूंची झलक या इमारतीमध्ये पाहायला मिळेल. संपूर्ण इमारतीला काचेचे आवरण असेल. आतही भरपूर सूर्यप्रकाश असावा याकरिता काचेचा वापर केलेला असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com