केंद्र व राज्य पथकाकडून चौकशी सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

तांत्रिकदृष्ट्या हेलिकॉप्टरची तपासणी; हेलिपॅड जागेला भेट
निलंगा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला निलंगा येथे झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्र व राज्याचे नऊ जणांचे पथक शुक्रवारी निलंग्यात दाखल झाले असून, त्यांनी घटनास्थळी जाऊन या घटनेची तांत्रिकदृष्ट्या व अन्य सर्व बाजूने चौकशी सुरू केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सहा जण निलंगा येथील दौरा आटोपून मुंबईला हेलिकॉप्टरने निघत असताना हा अपघात झाला होता. सर्व जण सुखरूप असले तरी या घटनेची गंभीर दखल केंद्रीय पातळीवर घेण्यात आली असून, मुंबईचे नागरी विमान उड्डाण विभागाचे प्रीतम रेड्डी व एस. पाल या दोन अधिकाऱ्यांसह उर्वरित तीन असे पाच जणांचे पथक सकाळी निलंगा येथे दाखल झाले असून, त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या वेळी हेलिपॅड ठिकाणाचे अंतर, जागा योग्य आहे का? परिसराची पाहणी केली. शिवाय हेलिपॅड ठिकाणचे मोजमापही घेण्यात आले. हेलिकॉप्टरची आतील व बाहेरच्या सर्व बाजूंनी तांत्रिकदृष्ट्या पाहणी केली आहे.

या गंभीर घटनेत कोणत्या विभागाने दुर्लक्ष केले का, हेलिकॉप्टर उड्‌डाण घेतेवेळी सुस्थितीत होते का, हेलिपॅड परवानगी देताना निष्काळजीपणा व काही चुका झाल्या का, हेलिपॅडचे ठिकाण योग्य होते का आदींबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झाली असून, हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच वैमानिकाला भोवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुपारी चार वाजता दिल्लीचे चार सदस्यांचे पथक निलंगा येथे दाखल झाले. त्यांच्याकडून हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या आहेत. या वेळी उपविभागीय अधिकारी भवानजी आगे, तहसीलदार विक्रम देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ रांजणकर आदी उपस्थित होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर पाहण्यासाठी आजही गर्दी झाली होती.