...अन्‌ पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना मारली मिठी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

निलंगा - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निलंगा तालुक्‍यातील विविध कार्यक्रम आटोपून हेलिपॅडवर आले. ते हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर हेलिकॉप्टर सुरू झाले नि बघ्यांची गर्दी बाजूला झाली. हेलिकॉप्टरने हवेत उड्डाण घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुरळा उडाला. त्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर कोसळल्याचे समजताच व्हीआयपी ताफ्यात असलेले पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर ताफा सोडून घटनास्थळाकडे धावले. या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.

मुख्यमंत्री बुधवारपासून निलंग्यात मुक्कामी होते. सकाळपासूनचे कार्यक्रम आटोपून मुंबईला परत जाताना हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने उड्डाण केले नि क्षणातच खाली कोसळले. तेव्हा काहीशी गोंधळाची स्थिती होती. काय घडले ते कोणालाही कळत नव्हते. फक्त कोसळलेले हेलिकॉप्टर दिसले.

तेव्हा पालकमंत्री परत निघत होते. अपघात घडल्याचे कळताच अपघातग्रस्त हेलिकॉप्टरकडे ते मदतीसाठी धावले. सुरक्षारक्षकांच्या ताफ्यामध्ये मुख्यमंत्री सुखरूप असल्याचे दिसल्यावरही पालकमंत्री निलंगेकर यांना अश्रू आवरता आले नाहीत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना मिठीच मारली व सर्वांना थेट घराकडे घेऊन गेले. मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेही धावले.