आता 'मूक' नव्हे; तर 'ठोक'ची गरज - नितेश राणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

माजलगाव (जि. बीड) - 'मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष केला. संकल्प केला. निवेदने दिली. लाखोंच्या संख्येने राज्यभर "मूक मोर्चे' काढून जागतिक क्रांती घडविली; मात्र सरकारला अद्याप जाग आली नाही. त्यामुळे आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी आता "मूक' नव्हे तर "ठोक' मोर्चे काढण्याची गरज आहे,'' असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.

सकल मराठा समाजाच्या वतीने वैष्णवी मंगल कार्यालयात शनिवारी आयोजित केलेल्या मराठा आरक्षण संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. आमदार राणे पुढे म्हणाले, 'लढाऊ, आक्रमक असलेल्या मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून राज्यभर मूक मोर्चे काढून जागतिक क्रांती घडविली; परंतु आताचे सरकार जागे झाले नाही. एवढेच नाही तर आरक्षणासाठी न्यायालयात साधे प्रतिज्ञापत्रही दिले नाही. जिजाऊ, शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणारे, मराठा क्रांती मोर्चाकडे इव्हेंट म्हणून पाहणाऱ्या सरकारकडून आरक्षणाची अपेक्षा करणे चुकीची आहे. क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत, सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी आता बाहेर पडा. नोटबंदी करणारे सरकार आरक्षण का देत नाही?, आरक्षण द्या, नाही तर मंत्रालय खाली करा हा संदेश देण्यासाठी आता ठोक मोर्चांची गरज आहे. जोपर्यंत मराठा समाजाबद्दल सरकारला भीती निर्माण होत नाही, तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही'', असे ते म्हणाले.