'विनाअनुदानित'वाला नवरा नको गं बाई

प्रमोद चौधरी
मंगळवार, 16 मे 2017

नांदेड - बऱ्याच वर्षांपूर्वी मराठी चित्रपटाची लेडी सुपरस्टार रंजना देशमुख आणि राजा गोसावींचा "असला नवरा नको गं बाई' हा चित्रपट येऊन गेला. त्यानंतर लोकशाहीर दादा कोंडकेंनी 'ह्योच नवरा पाहिजे' असे सांगत धमाल उडवून दिली होती. या चित्रपटांच्या शीर्षकांच्या संदर्भाने शिक्षकी पेशातील तरुणांची चर्चा आज सर्वत्र होऊ लागली आहे. अलिकडे शिक्षकाला मागणी वाढली असली तरीही "विनाअनुदानितवाला नको गं बाई', असा सूर सगळीकडे ऐकायला मिळत आहे.

कधी काळी मास्तरच्या स्थळाला नाके मुरडणारी मंडळी आज काल आपल्या उपवर मुलीसाठी शिक्षक नवरा शोधत फिरताना दिसत आहेत. सध्या बारावी, पदवीपर्यंत शिक्षणाची सोय खेड्यापाड्यातील मुलींनादेखील सुलभरीत्या उपलब्ध झाली आहे. अशा मुलींसाठी शिक्षकांच्याच स्थळाला प्रथम पसंती दिली जात आहे. नोकरदारांनाही वाढती मागणी आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजण्याची वेळ आणि सुट्ट्याचा सुकाळ असलेली आजघडीस शिक्षक ही एकमेव नोकरी आहे. शिवाय दर दहा वर्षांनी वेतन आयोग दोन्ही हाताने भरघोस वाढ करून मेहनताना पदरात आहे. शिवाय बायको, मुलांसाठी भरपूर वेळ देणारा शिक्षकच आहे. एकदा नोकरी लागल्यानंतर स्थिर, शाश्‍वत व सुरक्षित नोकरी असल्याने आर्थिक उन्नती होण्यास सध्याच्या सहाव्या वेतन आयोगाच्या आकड्यामुळे व येऊ घातलेल्या सातव्या वेतन आयोगामुळे अधिक काळ लागत नाही. म्हणून "शिक्षक नवरा हवा गं बाई' हा नारींचा नारा सध्या ऐकायला मिळतो आहे. शिक्षकी पेशात लागलेल्या उपवर तरुणांचे पाहुणे मित्रमंडळीकडून शोध घेतला जातो.

विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्‍न..
सकृतदर्शनी शिक्षकाचे स्थळ उत्तम असे मानून वधूपिते उपवर तरुणांत शिक्षक शोधतात; मात्र अगदी नवोदित अथवा पाच ते आठ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांची अधिक माहिती काढल्यानंतर ते विनाअनुदान शाळा व महाविद्यालयात असतील, तर त्यांच्या तुटपुंज्या कमाईची माहिती कळल्यावर अशा शिक्षकांच्या 'उपवर'तेवर काट मारली जाते. त्यामुळे साऱ्याच शिक्षकांना लग्नाच्या बाजारात मागणी आहे असे म्हणता येणार नाही. लालफितीमध्ये अडकलेला विनाअनुदानित शाळांवरील शिक्षकांचा प्रश्न तातडीने निकाली काढावा अशी मागणी आता 'उपवर' शिक्षकांकडून होत आहे.