सूर्यदर्शन होईना, पाऊसही येईना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जुलै 2016

जालना - जालना शहरासह तालुक्‍यात चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झालेले नाही. सकाळपासूनच आकाशात ढग दाटून येतात. आता जोरदार पावसाला सुरवात होईल, असे वाटत असतानाच पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जालना जिल्ह्यात अद्यापही सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. जूनमध्ये झालेल्या पावसानंतर काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. खरिपातील मूग, बाजरी, उडिदासह अनेक भागांत मका लागवड करण्यात आली आहे. खरिपातील सुमारे पन्नास टक्के पेरणी पूर्ण झाली आहे; मात्र दोन आठवड्यांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. आकाशात काळेभोर ढग दाटून आल्यानंतर आता मुसळधार पाऊस पडेल, असे वाटत असताना प्रत्यक्षात भूरभूर पाऊस पडत आहे. जालना, बदनापूर, जाफराबाद तालुक्‍यात अत्यल्प पाऊस आहे. लागवडीनंतर उगवून आलेल्या कपाशीला आता पाण्याची गरज आहे; मात्र विहिरी कोरड्या असल्याने शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. दरम्यान, जालना शहरात आज दुपारी दोन वाजता हलका पाऊस झाला. पावसाच्या रिमझिम सरी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरूच होत्या. त्यामुळे शहरातील खड्डेमय रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागली.