राष्ट्रवादीशी आघाडी नव्हे; "प्रासंगिक करार' 

ashok-chavan
ashok-chavan

नांदेड - कॉंग्रेसने नेहमीच समविचारी पक्षांशी आघाडीची तयारी दाखविली आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीनेच आघाडी तुटल्याचे जाहीर केले होते. परिणामी त्यानंतर जवळपास सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढविल्या आहेत. आताही आमची राष्ट्रवादी पक्षासोबत आघाडी नसून "प्रासंगिक करार' असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी (ता. 26) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेसला चांगले यश मिळाले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीतही कॉंग्रेसची चांगली कामगिरी राहील, असा विश्वास व्यक्त करून श्री. चव्हाण म्हणाले, समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासाठी कॉंग्रेसने नेहमीच पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आमचा "प्रासंगिक करार' असून त्या - त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर स्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. समविचारी पक्षांना आमची कधीही ना नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईला मंगळवारी (ता. 27) कॉंग्रेसच्या राज्यातील पदाधिकारी, वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असून तीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीवर चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

"थेट' नगराध्यक्षांना मर्यादा 
राज्यात नगराध्यक्षपदांच्या निवडी थेट जनतेतून झाल्या आहेत. त्यामुळे जिथे बहुमत नाही तिथे सभागृह चालविणे अवघड होणार आहे. याआधी असा प्रयोग झाला होता आणि तो फसला असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. कॉंग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष, आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलेला राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही. त्याबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल. 

भाजपला लगावला टोला 
मुंबईतील शिवस्मारकासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले, राज्यासह देशाचे भूषण असलेल्या शिवस्मारकासाठी मुंबईतील जागेची पाहणी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली होती. मुख्यमंत्रिपदाच्या माझ्या कालावधीत जागा अंतिम करण्यात आली. वास्तुविशारदाकडून मान्यता मिळविण्याचेही अंतिम करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर शिवस्मारकासाठी जल-भूमिपूजनाचा कार्यक्रम भाजपने हायजॅक केला आणि या कार्यक्रमाचा फायदा उठवला. ही बाब आक्षेपार्ह आहे. मूळ उद्देश, कार्यक्रमापेक्षा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचीच अधिक प्रसिद्धी झाल्याचा टोलाही श्री. चव्हाण यांनी लगावला. 

नोटाबंदीचा जनतेला त्रासच 
कोणतेही पूर्वनियोजन न करता केंद्राने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅंकेने आतापर्यंत जवळपास साठ निर्णय घेतले असून रोज नवीन आदेश निघत आहेत. या साऱ्याचे विपरीत परिणाम गोरगरीब जनतेला भोगावे लागत आहेत. नोटाबंदीचा अजूनही सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. राज्य सरकारही केवळ घोषणा करत असून त्या कागदावरच राहत आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, सर्वसामान्य जनतेच्या हाती अद्याप काहीच लागले नसल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकार परिषदेला आमदार डी. पी. सावंत, आमदार वसंत चव्हाण, प्रवक्ते संतोष पांडागळे आदी उपस्थित होते. 

"दंगल' करमुक्त करावा 
आमीर खानचा सध्या झळकलेला "दंगल' चित्रपट सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. मुलगा - मुलगी एकसमान दाखविण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. इतर राज्यांत हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही तो करमुक्त करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे आजच केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com