औरंगाबादेत लाखोंची 'माया' कचऱ्यात!

notes dustbin in aurangabad
notes dustbin in aurangabad

सूतगिरणी चौक, पुंडलिकनगरात पाचशेच्या नोटा फाडून फेकल्या

औरंगाबाद:
या ना त्या मार्गाने साठवणूक करून जमविलेली धनदांडग्यांची "माया' नोटाबंदीमुळे आता धोक्‍यात आली आहे. अशाच काहींनी चक्क रस्त्यांवर, कचऱ्यात झुडपांत लाखोंची "माया' अक्षरश: फाडून फेकली. सूतगिरणी चौक व साईनगर भागात गुरुवारी (ता. 17) सकाळी उघड झालेली ही घटना औत्सुक्‍याचा विषय ठरत आहे.

गारखेडा भागातील सूतगिरणी चौकालगत रस्त्याच्या कडेला लावलेल्या पत्र्यांच्या बाजूला झुडुपे आहेत. या झुडुपांलगत कचऱ्यात पाचशे रुपयांच्या फाडलेल्या नोटा नागरिकांना पडलेल्या दिसल्या. काहींनी फाटक्‍या नोटांवरही उडी घेतली. दरम्यान, सुजाण नागरिकांनी ही बाब जवाहरनगर पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर, उपनिरीक्षक महांडुळे तेथे पोचले. गर्दी हटवून त्यांनी फाटक्‍या नोटांचे तुकडे गोळा केले. कचऱ्यात, आजूबाजूला शोध घेऊन पोलिसांनी नोटा व तुकडे जप्त केले. परिसरात चाचपणी केली, त्या वेळी एक आधार कार्ड पोलिसांना सापडले. इम्रान जब्बार कोरबू (रा. कोरबू गल्ली, ता. तेर, जि. उस्मानाबाद) अशी आधार कार्डवर नोंद होती. या व्यक्तीकडे पैसे होते काय, उस्मानाबादचे आधार कार्ड शहरात कसे याबाबत तर्कवितर्क लावले जात असून या प्रकरणात शोध घेत आहोत, तसेच काहींची विचारपूस करीत असल्याचेही निरीक्षक कल्याणकर म्हणाले.

सूतगिरणी भागातील घटना उघड होत नाही, तोच गारखेड्यातील साईनगर भागातही अशाच नोटा सापडल्याची माहिती पोलिसांना समजली. यानंतर मुकुंदवाडी पोलिसांचे पथक पुंडलिकनगर भागात पोचले; पण त्यांना घटनास्थळ लवकर सापडले नाही, याच वेळात कचरावेचक व काहींनी तेथील फाटक्‍या-चांगल्या नोटा गायब केल्या. पोलिस पोचले, त्या वेळी झांबड इस्टेटमागे कचऱ्यात पाचशेच्या चुरगाळा व तुकडे केलेल्या नोटांचा मोठा साठा दिसला. पोलिसांनी हा साठा जप्त केला. मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

नोटांची पळवापळवी
फाडलेल्या नोटांचा साठा सापडल्यानंतर कचरा वेचणारी मुलेही चक्रावली. मात्र, त्यांनी लगेचच जेवढ्या मिळतील तेवढ्या नोटा पटापट पिशवीत भरल्या व पोलिस येण्याआधीच त्यांनी तेथून पोबारा केला, अशी प्रत्यक्षदर्शीने माहिती दिली.

आयकर विभागाची घेणार मदत
फेकलेल्या नोटांची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे. यात कायदेशीर बाबी तपासून कारवाई करू. या नोटा कोणी फेकल्या, याच्या माहितीसाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरांचा आधार घेत असून फुटेजमधून नोटा टाकणाऱ्यांचे बिंग फुटू शकते, अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली.

रकमेचा मूळ आकडा कळेना
पाठोपाठ दोन ठिकाणी सापडलेल्या लाखोंच्या घबाडामुळे पोलिसांची दिवसभर मोठी धावपळ उडाली. नोटा फेकणाऱ्यांची माहितीही अद्याप प्राप्त नसून, नोटांचा मूळ आकडाही अद्याप स्पष्ट नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com