संच क्रमांक सहा करतोय क्षमतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

परळी वैजनाथ - येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 250 मेगावॉटचा संच क्रमांक सहा क्षमतेपेक्षा अधिक वीजनिर्मिती करून उच्चांक साधत आहे. त्यामुळे राज्यातील वीज तुटवडा कमी करण्यासाठी मोठा हातभार लागत आहे. दरम्यान, नव्याने सुरू झालेला 250 मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक आठ मात्र विविध कारणांनी सतत बंद पडत आहे.

येथे 30 मेगावॉट क्षमतेचे दोन, 210 मेगावॉट क्षमतेचे तीन असे एकूण पाच वीजनिर्मिती संच कार्यान्वित होते. त्यानंतर परळी-गंगाखेड मार्गावर दाउतपूर शिवारात 239 हेक्‍टर शेतजमिनीवर जानेवारी 2004 ला 250 मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक सहाच्या उभारणीला सुरवात झाली. या संचाला जोडूनच तेवढ्याच क्षमतेचा संच क्रमांक सातही उभारण्यात आला. या संचातून ऑक्‍टोबर 2009 मध्ये प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू झाली. याच दरम्यान ऑगस्ट 2009 मध्ये संच क्रमांक सहा व सातला लागूनच 250 मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता असलेला संच क्रमांक आठ उभारण्यात आला. सध्या केंद्रातील प्रत्येकी 250 मेगावॉट क्षमतेचे सहा, सात व आठ क्रमांकांचे संच सुरू आहेत. संच क्रमांक सहाची वीजनिर्मितीची क्षमता 250 मेगावॉट आहे; परंतु या संचातून गेल्या काही दिवसांपासून क्षमतेपेक्षा अधिक वीजनिर्मिती होत आहे. 260 मेगावॉटपेक्षाही अधिक क्षमतेने तो चालत असल्याने राज्यातील इतर संचांच्या तुलनेत विक्रमी वीजनिर्मितीचा उच्चांक हा संच सध्या करीत आहे.

उन्हाळ्यामुळे सध्या राज्यात विजेचा तुटवडा आहे. या पार्श्‍वभूमीवर वीज तुटवडा भरून काढण्यासाठी या संचाची मोठी मदत होत आहे. हा संच अधिक वीजनिर्मिती करीत असल्याने केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

नवा संच मात्र ठप्प
नव्या 250 मेगावॉट क्षमतेच्या संच क्रमांक आठमधून गेल्या महिन्यात प्रत्यक्ष वीजनिर्मितीला सुरवात झाली. या ना त्या कारणांनी तो बंद पडत आहे. त्यामुळे या संचातून वीजनिर्मिती ठप्प झाली आहे.

टॅग्स