उंची वाढविण्यासाठी आक्षेपार्ह औषधांची विक्री!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - उंची वाढविण्यासाठी आक्षेपार्ह औषधांची विक्री करून पैसे उकळणाऱ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी पर्दाफाश केला. छापा टाकून चार लाखांची औषधी व जाहिरातीचे साहित्य आणि एका संशयिताला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

औरंगाबाद - उंची वाढविण्यासाठी आक्षेपार्ह औषधांची विक्री करून पैसे उकळणाऱ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी पर्दाफाश केला. छापा टाकून चार लाखांची औषधी व जाहिरातीचे साहित्य आणि एका संशयिताला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

औरंगाबाद शहरात काही ऑटोरिक्षांवर उंची वाढवा, फायदा न झाल्यास पैसे वापस देऊ, अशी हमी देत जाहिरात चिकटवण्यात आली होती. या बाबी अन्न व औषध प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी जाहिरातीतील क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी त्यांना उंची वाढवण्याच्या औषधींची मागणी केली असता, दहा हजारांची औषधी घ्यावी लागतील, असे सांगण्यात आले. त्यांची मागणी पूर्ण करून अन्न व औषध प्रशासनाने त्यांना बोगस पत्ता देऊन औषधी पाठविण्यास सांगितले. मंगळवारी (ता. चार) औषध पुरवठा करणाऱ्या दिल्लीस्थित एका कंपनीच्या बिलासह विक्री प्रतिनिधी अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या पत्त्यावर आला. त्यावेळी औषधांची तपासणी करून प्रतिनिधीला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, दिल्लीच्या एका संस्थेच्या नावे उंची वाढवण्याची औषधी औरंगाबाद येथूनच विक्री व वितरित करीत असल्याचे समोर आले. तसेच बोगस बिल देत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अन्न व औषध प्रशासनाने उमाजी कॉलनी, वेदांतनगर येथे झडती घेत एका खोलीतून चार लाखांची औषधी व जाहिरातीचे साहित्य जप्त केले. ही कारवाई विभागाचे सहआयुक्त अमृत निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त दस्तगीर शेख, राजकुमार झाडबुके, औषध निरीक्षक माधव निमसे, प्रवीण हरक यांनी केली. 

रेल्वेने आणत होते औषधी
चंदर सोमर (रा. दिल्ली) असे विक्री प्रतिनिधीचे नाव असून तो दिल्लीस्थित ओमसाई आयुर्वेद इंडिया लिमिटेड या संस्थेकडून रेल्वेद्वारे औषधी आणत होता. त्याच्याकडे चार प्रकारच्या औषधांचा साठा सापडला. साथीदारांसह रिक्षांवर जाहिरात लावून औषधांची विक्री करीत असल्याची कबुली चंदरने दिल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.

सहा इंच उंची वाढण्याची हमी
तीन महिने औषधी घेतली की, चार ते सहा इंच उंची वाढेल अशी हमी विक्री प्रतिनिधी देत होते. उंची वाढवण्यासाठी ‘विकास बुटी’, स्थूलतेसाठी असलेले ‘मदमधुर’ तसेच वजन कमी करण्यासाठीचे ‘मधुर अमृत’ आदी औषधींचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. जाहिरात लावणाऱ्या रिक्षा व वाहनांवरही कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागरिकांना आवाहन
उंची वाढवणे, वजन घटवणे, स्थूलता कमी करणे यासह कामोत्तेजनेसंबंधी भडक व बोगस जाहिराती केल्या जात आहेत. या औषधी ऑनलाईनही विकल्या जात आहेत. यात नागरिकांची फसवणूक होण्याची जास्त शक्‍यता आहे. त्यामुळे अशा जाहिरातींना बळी पडू नका, असे आवाहन अन्न व औषधी प्रशासनाने केले आहे.

Web Title: Offensive sell medicines to increase height