ओम बाबाजी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये गेलेले 55 यात्रेकरू सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

फुलंब्रीतील 32, सिल्लोडमधील सहा जणांचा समावेश, आज पहाटे केदारनाथला निघणार
सिल्लोड - केदारनाथ येथे दर्शनासाठी घाटनांद्रा (ता. सिल्लोड) येथील ओम बाबाजी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमध्ये चार कर्मचाऱ्यांसह 55 यात्रेकरू गेले असून, हे सर्वजण सुरक्षित आहेत, अशी माहिती या ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक मनोहर पंडित यांनी "सकाळ' शी बोलताना दिली.

केदारनाथ रस्त्यावरील जोशी मठाजवळ शुक्रवारी (ता.19) दुपारी तीनच्या सुमारास भूस्खलनामुळे मोठमोठे दगड कोसळून रस्ता ठप्प झाला होता. त्यात या यात्रेकरूंची बस अडकली. बसमध्ये देऊळगाव बाजार (ता. सिल्लोड) येथील सहा, वाघलगाव (ता. फुलंब्री) येथील 32, भराडी पारधी (ता. जामनेर) येथील सहा, संगमनेर (ता. संगमनेर) येथील चार, परळी (ता. परळी) येथील तीन यात्रेकरूंचा समावेश आहे.

घाटनांद्रा येथील ट्रॅव्हल्स कंपनीचे चार कर्मचारी सोबत आहेत. एकूण 55 जण बसमध्ये असून, हे सर्वजण सुरक्षित आहेत, असे श्री. पंडित यांनी सांगितले.

घटना घडल्यानंतर तेथील नगर परिषद प्रशासनाने यात्रेकरूंना शाळेचा हॉल उपलब्ध करून दिला. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची व्यवस्था करून दिली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी हे सतत या यात्रेकरूंच्या संपर्कात आहेत. आवश्‍यक ती मदत देण्याबाबत वेळोवेळी यात्रेकरूंशी संपर्क साधला जात आहे.

मलबा हटवून रात्री वाहतूक सुरळीत सुरू
रस्त्यावरील मलबा हटवून शनिवारी (ता.20) रात्री साडेसातच्या सुमारास वाहतूक सुरळीत सुरू झाली असल्याची माहिती श्री. पंडित यांनी दिली. रस्ता सुरू होण्यास रात्री उशीर झाल्यामुळे हे सर्व जण तिथेच शाळेमध्ये मुक्कामी थांबले असून, रविवारी पहाटे चार वाजता बद्रीनाथकडे दर्शनासाठी निघून नंतर परतीचा प्रवास सुरू करणार आहेत.

Web Title: om babaji travels pilgrims secure