हॉस्पिटलच्या बिलात केला तब्बल एक कोटी चाळीस लाखांचा अपहार 

हॉस्पिटलच्या बिलात केला तब्बल एक कोटी चाळीस लाखांचा अपहार 

औरंगाबाद - बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांनी दिलेल्या बिलांची रक्‍कम हडपून, त्यांना औषधोपचाराच्या नावे पावत्या तयार करून दिल्या. अशाच प्रकारे सुमारे एक कोटी 41 लाख 97 हजार 122 रुपयांचा अपहार हॉस्पिटलच्याच कर्मचाऱ्यांनी केल्याचा प्रकार उघड झाला. 

कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये 23 जानेवारी 1993 ते 2015 दरम्यान अनिल नानाराव झाल्टे, ज्ञानेश्‍वर डोके, रमेश तुकाराम राठोड, राजेश गायकवाड हे कामाला होते. त्यांच्याकडे बिलिंग सेक्‍शनची जबाबदारी होती. या हॉस्पिटलचे मार्च 2015 मध्ये ऑडिट करण्यात आले. त्या वेळी रकमेत घोळ आला. नीलेश मते या रुग्णाला बिलाची पावती देण्यात आली; पण याची संगणकात नोंद नसल्याचे आढळून आले. विशेष ऑडिट केल्यानंतर सहाशे सतरा प्रकरणांत चौघांनी फायनल बिल तयार न करता, रुग्णांकडून 99 लाख 24 हजार 77 रुपये घेतले. हे पैसे हॉस्पिटलच्या बिलिंग सेक्‍शनमध्ये जमा न करता त्यांनी परस्पर हडपले. तसेच 636 प्रकरणांत त्यांनी 42 लाख 73 हजार पंचेचाळीस रुपये बिल वसूल केले; परंतू ते बिलिंग सेक्‍शनमध्ये जमा केले नाहीत. असा एकूण एक कोटी 41 लाख 97 हजार 122 रुपयांचा त्यांनी अपहार केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्यंकट किशनराव होळसंबरे यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, संशयित अनिल झाल्टे, ज्ञानेश्‍वर डोके, रमेश राठोड, राजेश गायकवाड यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. याप्रकरणात उपनिरीक्षक आर. ई. बागूल तपास करीत आहेत. 

रुग्णांना दिले औषधोपचारांचे बिल 
संशयित चौघा कर्मचाऱ्यांनी औषधोपचाराचे बिल तयार करून रुग्णांना दिले. त्याच्या दुय्यम प्रती रेकार्डवर ठेवल्या नाहीत. रक्कमही हॉस्पिटलमध्ये जमा केली नाही. असा एकूण एक कोटी 41 लाख 97 हजार 122 रुपयांचा त्यांनी अपहार केला. 

असा झाला घोटाळा उघड 
बजाज हॉस्पिटलमध्ये एक एप्रिल 2015 ला आलेले रुग्ण नीलेश मते यांना बिलाची पावती देण्यात आली नव्हती. विशेषत: संगणकातही यासंबंधी नोंद नव्हती. ही बाब लक्षात आल्यानंतर हॉस्पिटल व्यवस्थापनाने स्पेशल ऑडिट केले. त्यात चौघांनी संगनमत करून घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com