अकाेला: स्वाईन फ्लूचा आणखी एक रुग्ण

प्रविण खेते
सोमवार, 15 मे 2017

बचावासाठी हे करा

  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
  • शिंकताना किंवा खाेकताना नाकावर रुमाल ठेवा
  • नियमीत हात धुवा
  • लक्षणे आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या

अकाेला : झपाट्याने वाढणाऱ्या स्वाईन फ्लूच्या रुग्ण संख्या वाढण्यास विराम बसला हाेता. परंतु, महिना हाेत नाही ताेच स्वाईन फ्लूचा आणखी एक रुग्ण पॉझिटीव्ह आल्याची बाब समाेर आली आहे. स्वाईन फ्लूचे संकट अजूनही कायम असल्याने नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याची गरज आहे.

शहरातील डाबकी राेड भागातील एक महिला स्वाईन फ्लू पाॅझिटीव्ह असल्याचा प्रकार साेमवारी उघडकीस आला. मार्च महिन्यात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळून आला हाेता. त्यानंतर या आजाराचा शहरात झपाट्याने प्रसार झाला. दाेन महिन्यात पाच जणांचा मृत्यू या आजाराने झाला.

दरम्यान मे महिन्यात वाढत्या तापमानामुळे स्वाईन फ्लूचा कहर कमी झाल्याचे दिसत हाेते. परंतु साेमवारी आणखी एक रुग्ण आढळून आला. ही महिला डाबकी राेड भागातील रहिवासू असून, तीला स्वाईन फ्लू सदृश लक्षणे आढळून आल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

येथे तपासणी केल्यानंतर महिला स्वाईन फ्लू पॉझिटीव्ह असल्याचे उघड झाले. यापूर्वी स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आणि संशयित दाेन्ही मिळून स्वाईन फ्लूची रुग्ण संख्या १३ वर पाेहाेचली हाेती. आता ही संख्या वाढली आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ हाेत असल्याने जिल्ह्यासह शहर आराेग्य विभाग सतर्क झाला अन् नागरीकांना दक्षतेचा इशारा दिला.

    Web Title: One more patient detected with Swine Flu in Akola