ऑनलाईन सुविधांमुळे कुरिअर व्यवसायाला ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

औरंगाबाद - पूर्वी कोणतीही कागदपत्रे पाठविण्यासाठी टपाल किंवा खासगी कुरिअर कंपनीकडे धाव घ्यावी लागायची. मात्र, दहा वर्षांत माहिती तंत्रज्ञानात झालेली क्रांती, सर्व डाक्‍युमेंट ऑनलाईन पाठविण्याची सहज सुविधा, स्मार्ट फोन, इंटरनेट सेवांचे वाढते जाळे, ऍप्स यांचा खासगी कुरिअर कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही वर्षांत छोट्या कुरिअर कंपन्या, कुरिअर व्यवसाय करणाऱ्या संस्था बंद पडल्या आहेत. 

औरंगाबाद - पूर्वी कोणतीही कागदपत्रे पाठविण्यासाठी टपाल किंवा खासगी कुरिअर कंपनीकडे धाव घ्यावी लागायची. मात्र, दहा वर्षांत माहिती तंत्रज्ञानात झालेली क्रांती, सर्व डाक्‍युमेंट ऑनलाईन पाठविण्याची सहज सुविधा, स्मार्ट फोन, इंटरनेट सेवांचे वाढते जाळे, ऍप्स यांचा खासगी कुरिअर कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही वर्षांत छोट्या कुरिअर कंपन्या, कुरिअर व्यवसाय करणाऱ्या संस्था बंद पडल्या आहेत. 

आज औरंगाबादेत देश-विदेशात सेवा देणाऱ्या 200 कुरिअर कंपन्या आहेत. त्यापैकी 100 कुरिअर कंपन्यांकडे विदेशात डॉक्‍युमेंट पाठविण्याची सुविधा आहे. तसेच ज्या कंपन्यांकडे सुविधा नाहीत अशा कंपन्या इतर कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून ती सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

ऑनलाईन सेवांमुळे कुरिअर कंपन्यांना फटका
सध्या देश-विदेशात बहुतांश डॉक्‍युमेंट, माहिती पाठविण्यासाठी ई-मेल, एसएमएसचा वापर केला जातो. त्याशिवाय व्हॉट्‌सऍप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा माहिती पाठविणे सहज शक्‍य झाले आहे. याचा फटका कुरिअर व्यवसायाला बसला आहे. कुरिअर व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे विविध शासकीय कार्यालये, बॅंका, खासगी कार्यालये यांच्याशी करार केलेले असतात. त्यांना वार्षिक निविदेच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. मात्र सध्या देशविदेशात डाक्‍युमेंट पाठविणे कमी झालेले असल्याने कुरिअरमधील डॉक्‍युमेंट पाठविण्याच्या व्यवसायात 70 ते 80 टक्के घट झाली आहे. माहिती तंत्रज्ञानात क्षणात कोणतीही कागदपत्रे पाठविणे सहज शक्‍य झाले आहे. त्यातच जेथे फक्त मूळ कागदपत्रांची गरज असते अशाच वेळी ही कागदपत्रे पाठविली जातात.

औरंगाबादेत 200 कंपन्या, व्यावसायिक
औरंगाबादेतून देशविदेशात कुरिअर सेवा देणाऱ्या जवळपास 200 कंपन्या, व्यावसायिक आहेत. त्यांच्या माध्यमातून विदेशात ही कागदपत्रे पाठविली जाऊ शकतात. यात औरंगाबादेत शंभर कंपन्यांच्या माध्यमातून विदेशात पार्सल पाठविले जातात. यामध्ये प्रत्येक कंपन्या वेगवेगळ्या देशातील अंतरानुसार, ग्रॅमनुसार पैसे आकारतात. विदेशात कुरिअर करण्यासाठी प्रत्येक कंपन्यांचे वेगवेगळे दर आहेत.

आता कुरिअर कंपन्या वळताहेत कार्गो सेवेकडे
कुरिअर व्यवसायातून आर्थिक लाभ मिळणे दिवसेंदिवस कमी होत असल्याने अनेक कंपन्या आता कार्गो सेवेकडे वळत आहेत. अनेक जण सध्या ऑनलाईन खरेदी करतात. त्यामुळे पार्सल पाठविण्याचा व्यवसायसुद्धा खूप वाढल्याने याकडे या कुरिअर कंपन्या वळत आहेत. सध्या अनेक कंपन्यांमधून कार्गो सेवेच्या ऑर्डर मिळत असल्याने या व्यवसायाकडे कुरिअर कंपन्यांना वळावे लागत आहे. तसेच सेवाकर, अनेक कागदपत्रे तसेच कंत्राट देणारी कार्यालये, कंपन्या अनेक प्रकारची चौकशी, कर्मचारी, सेवा याबद्दल अनेक अटी घालत असल्याने कुरिअर कंपन्यांची अडचण होत आहे.

टपाल विभागाची चलती
विदेशात डॉक्‍युमेंट पाठविण्यासाठी भारतीय टपाल खाते आघाडीवर आहे. सध्या टपाल खाते 99 देशांत आपली स्पीड पोस्टची सेवा देते. मात्र, इतर देशांत ही सेवा नसल्याने पर्यायाने खासगी कुरिअर कंपन्यांचीच सेवा घ्यावी लागते. साधारणपणे या 99 देशांत भारतीय टपाल खाते 250 ग्रॅमसाठी 400 ते 900 रुपयांपर्यंत रक्कम आकारते. तसेच यासाठी ट्रॅकिंग नंबर दिलेला असल्याने टपाल मिळाले किंवा नाही ते ऑनलाईन कळते. याशिवाय शासकीय, न्यायालयीन कागदपत्रे पाठविण्यासाठी फक्त टपाल खात्याचा वापर केला जात असल्याने ही कागदपत्रे फक्त टपाल विभागाकडूनच पाठविली जातात.

""28 वर्षांपासून मी या कुरिअरच्या व्यवसायात आहे. मात्र ऑनलाईन सेवा, माहिती तंत्रज्ञानामुळे डाक्‍युमेंट पाठविण्याच्या व्यवसायात जळपास 70 ते 80 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. आम्हाला आता कुरिअर सेवेसोबत कार्गो सेवेकडे वळावे लागत आहे.‘‘
- रवी कुलकर्णी (व्यवस्थापक, प्रोफेशनल कुरिअर, औरंगाबाद)