उस्मानाबाद, जालन्यात अवकाळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

औरंगाबाद - उस्मानाबाद व जालना जिल्ह्याच्या काही भागांत आज दुपारनंतर वादळी वारा व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तुळजापूर तालुक्‍यातील अणदूर, नळदुर्ग, उमरगा तालुक्‍यांतील आलूर, बलसूर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दुपारी तीननंतर मेघगर्जनेसह सुमारे 15 मिनिटे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील रोहिलागड परिसरातील किनगाव, किनगाववाडी, नांदी येथे दुपारी चारच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी वारा व हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. तर, मंठा तालुक्‍यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. तुळजापूर तालुक्‍यातील सारोळा येथे अंगावर वीज कोसळून शेळ्या राखण करणारी महिला ठार झाली. या संदर्भात आकस्मिक घटनेची नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मी किसन चौगुले (वय 55, रा. सारोळा) असे मृत महिलेचे नाव आहे.