आरोग्य यंत्रणाच सलाईनवर

तान्हाजी जाधवर
रविवार, 16 जुलै 2017

जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय समस्येच्या गर्तेत

उस्मानाबाद - जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या सलाईनवर असल्याचे चित्र आहे. जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये विविध समस्येच्या गर्तेत असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. जिल्हा रुग्णालय कागदोपत्री क्रमांक एकवर असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे; मात्र रुग्णालय प्रशासन त्याकडे कानाडोळा करण्यात समाधान मानत आहे. 

जिल्हा रुग्णालय ही सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी तत्पर असणारी आरोग्य संस्था; पण सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा मिळण्याऐवजी हेळसांड सहन करावी लागते.

डायलिसीस, एक्‍स-रे, ब्लड बॅंक, अतिदक्षता विभाग अशा सुविधामध्ये कुचराई होताना दिसत आहे. ब्लड बॅंक सुरू झाल्यापासून येथे रक्तघटक उपलब्ध करून देण्याची सुविधा नाही.

अपघातातील गंभीर जखमीवर बहुतांश वेळा प्राथमिक उपचार केल्यानंतर रेफर केले जाते. अद्ययावत सुविधा नसल्याने शस्त्रक्रियेसाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलविले जाते. जिल्हा रुग्णालयातील अनेक विभागात अद्ययावत यंत्रणा नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. राजीव गांधी जीवनदायी योजनेचा तर पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. 

या योजनेतून केवळ डायलिसीसची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.  अन्य उपचारासाठी खासगी रुग्णालयात किंवा जिल्ह्याबाहेरील दवाखान्यावर विसंबून राहावे लागते. नेत्र विभागात केवळ मोतीबिंदूशिवाय अन्य शस्त्रक्रिया सुविधांअभावी होत नसल्याने रुग्णांना खासगीच पर्याय स्वीकारावा लागतो.

प्रशासन गतिमान नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्याचे चित्र आहे. औषधाचा पुरवठा सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहे. बहुंताशी औषधीसाठी रुग्णांना चिठ्ठी दिली जात असल्याने बाहेरून औषधी घ्यावी लागते.दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्या दोन्ही मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला; मात्र दोन्ही क्रमांकावर ऑऊट ऑफ कव्हरेज असल्याने डॉ. माले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पावसाच्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यांच्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहारातून पाठपुरावा करीत आहोत. काही ठिकाणी रिक्त संख्येमुळे अडचणी येत आहेत. बहुतांश ग्रामीण रुग्णालयांत चांगली स्थिती आहे.
- डॉ. धनंजय पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.

रिक्‍त जागांमुळे रुग्णांची हेळसांड
रिक्‍त जागांमुळेही विपरीत परिणाम होत आहे. वर्ग एकच्या अकरा जागा रिक्त असून त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. महिलांसाठी शहरात स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी करण्यात आली असली तरी सोनोग्राफी मशीन तब्बल तीन वर्षांनंतर उपलब्ध झाली. प्रसूतीचे प्रमाण अधिक आहे; मात्र सोयी-सुविधांचा बोजवारा उडाल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.