साडेतीन हजार शेतकरी वीजजोडणीपासून वंचित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

उस्मानाबाद - महावितरण आपल्या दारी योजनेतील साडेतीन हजार शेतकरी वीजजोडणीपासून वंचित, अंदाजे रीडिंग घेऊन देयके दिली जात असल्याने ग्राहकांची होणारी लूट, तसेच जिल्ह्यात ४०० के.व्ही. उपकेंद्र तयार करणे आदी समस्या सोडविण्याचे आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर आहे. ते बुधवारी (ता. २८) जिल्हा दौऱ्यावर असून, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

मीटरची रीडिंग न घेताच अंदाजे बिल देण्याचा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्याच्या अनेक भागांत सुरू आहे. अजूनही बहुतांश ग्राहकांना अंदाजे मीटर रीडिंगची बिले दिली जातात. वर्षातून एकदाच अव्वाच्या सवा बिल ग्राहकाला देऊन ठेकेदार रिकामे होतात. त्यानंतर बिल दुरुस्तीसाठी ग्राहकाचा वीज कंपनीच्या कार्यालयात प्रवास सुरू होतो. विशेष म्हणजे प्रत्येक ग्राहकाच्या एका रीडिंगसाठी ठेकेदाराला पाच ते सात रुपये दिले जातात. जिल्ह्यात महिन्याला बिल रीडिंगसाठी १५ ते २० लाख रुपयांचा चुराडा होतो. कंपनीचे अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने असा प्रकार करीत असल्याचा आरोप ग्राहकांतून होत आहे.

महावितरण आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून २०१० पासून जिल्ह्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांनी डिमांड भरले आहेत; परंतु अद्यापही या शेतकऱ्यांना वीजजोडणी मिळालेली नाही. विशेष म्हणजे २०१५-१६ वर्षात डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना वीजजोडणी दिली जात आहे; परंतु या शेतकऱ्यांना केवळ दोन ते चार विद्युत खांब, तारांची आवश्‍यकता असताना टाळाटाळ होत आहे. वीजजोडणी मिळत नसल्याने या शेतकऱ्यांचे वीजपंप अद्याप सुरू झाले नाहीत. गेल्या चार-पाच वर्षांपासून हे शेतकरी कंपनीच्या दारात वारंवार खेटे मारीत आहेत; परंतु या शेतकऱ्यांना आश्‍वासनाशिवाय काहीच मिळालेले नाही.  परळी वीजनिर्मिती केंद्रातून उस्मानाबादमार्गे सोलापूरच्या दिशेने ४०० केव्ही उपकेंद्रांची लाईन गेलेली आहे. परळी येथील वीजनिर्मिती बंद पडल्यानंतर जिल्ह्यात येणारी २२० के.व्ही.ची लाईन बंद पडते. परिणामी लांबोटी-सोलापूर येथून येणाऱ्या २२० के.व्ही.च्या लाईनद्वारे जिल्ह्यात वीज उपलब्ध होते; परंतु यातून विजेचा दाब कमी होतो व जिल्ह्यात व्होल्टेज मिळत नसल्याच्या तक्रारी वाढतात. शेतीवरील वीजपंप सुरू होत नाहीत. त्यामुळे उस्मानाबाद तालुक्‍यात ४०० के.व्ही.चे केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात आहे.