वीज पडून 1 शेतकरी जागीच ठार, 1 गंभीर

नितीन टेकाळे
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

पावसाला सुरवात झाल्यामुळे दोघे त्याच परिसरातील लिंबाच्या झाडाखाली थांबले. त्या झाडावर वीज कोसळली, यामध्ये रमेश कवडे जागीच ठार झाले. तर निवास कवडे गंभीर जखमी झाले

वाशी (जि. उस्मानाबाद) : वाशी येथे वीज पडून एक शेतकरी जागीच ठार झाला, तर अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (ता. 8) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कण्हेरी (ता. वाशी) शिवारातील शेतात घडली. 

वाशी शहर व परिसरात रविवारी दुपारी दीड वाजलेपासून तासभर विजेच्या कडकडाटासह जोरदार पाउस झाला. रमेश एकनाथ कवडे (वय ६० वर्षे) व निवास चंद्रसेन कवडे (वय ४५ वर्षे, दोघेही रा. वाशी) हे दोघे दुपारी त्याच्या शेताजवळील कवडे माळरान शिवारात गुरे घेऊन गेले होते.

दुपारी दीडच्या सुमारास अचानक पावसाला सुरवात झाल्यामुळे ते दोघे त्याच परिसरातील लिंबाच्या झाडाखाली थांबले. त्या झाडावर वीज कोसळली, यामध्ये रमेश कवडे जागीच ठार झाले. तर निवास कवडे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील सरकारी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.
रमेश कवडे यांच्या पश्चात पत्नी, चार मुले असा परिवार आहे. शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून ते वाशी शिवारात ओळखले जात. त्याच्या आकस्मिक निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

    Web Title: osmanabad news a farmer dies in lightening