हरभऱ्याला साडेतीन ते तीन हजार सातशेचा भाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

उस्मानाबाद - जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात हरभरा पिकाचे क्षेत्र दुपटीने वाढले आहे. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल साडेतीन हजार ते तीन हजार ७०० रुपये दर आहे. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या हरभऱ्याचे पीक काढणीला आले आहे. पुढील महिनाभरात बहुतांश शेतकरी काढणीची कामे आटोपण्याची शक्‍यता आहे. मात्र, हमीभाव नसल्यामुळे हरभऱ्याची आवक सुरू होताच दर काय असतील, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ७४ हजार १०० हेक्‍टर आहे. मात्र, यंदा परतीच्या पावसामुळे जमिनीचा वाफसा होण्यास विलंब झाल्यामुळे रब्बी हंगामातील पेरणीलाही विलंब झाला. परिणामी, बहुतांश शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी हरभरा पेरणीला पसंती दिली. त्यामुळे जिल्ह्यात एक लाख ५२ हजार २०० हेक्‍टरमध्ये २०५ टक्के क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी झाली आहे. काही ठिकाणी हरभरा पीक काढणीला आले आहे; तर बहुतांश ठिकाणी हे पीक फुलोरा, फळधारणेत आहे. दरम्यान, यंदा हरभऱ्याचे क्षेत्र दुपटीने वाढल्यामुळे जिल्ह्यात दरवर्षीपेक्षा हरभऱ्याचे उत्पादनही वाढणार आहे. बाजारपेठेत कोणत्याही धान्याची आवक सुरू होताच दरामध्ये घसरण सुरू होते. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो.

हरभरा पिकाच्या काढणीनंतरही अशीच परिस्थिती निर्माण झाली, तर शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागण्याची शक्‍यता शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. बाजारपेठेत सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल साडेतीन हजार ते तीन हजार ७०० रुपये दर आहे. कोणताही शेतीमाल बाजारपेठेत विक्रीसाठी येण्यापूर्वी दर चांगले होतात. मात्र, आवक सुरू होताच त्यात घसरण सुरू होते. हा अनुभव दरवर्षी शेतकऱ्यांना येतो. यंदा तर खरीप हंगामातील तूर, सोयाबीन, मूग, उडीद या शेतीमालाचे सुरवातीचे दर आवक सुरू होताच घसरत गेले. त्यात शेतकऱ्यांना फटका बसला, तर व्यापाऱ्यांची चंगळ झाली. हमीभाव केंद्रावरील शेतीमाल विक्रीला घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. ऑनलाइन नोंदणी करणे, विक्रीसाठी मर्यादा या बाबींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. तुरीची काढणी होऊन महिना झाला तरी अद्याप हमीभाव केंद्रे सुरू झाली नाहीत. तशी परिस्थिती हरभरा पिकाच्या काढणीनंतर येऊ नये, यासाठी सरकारने आतापासूनच काळजी घ्यावी व त्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.

Web Title: osmanabad news harbhara 3 to 3.5 thousand rate