इंटरनेटचा अतिवापर करताय? सावधान!

इंटरनेटचा अतिवापर करताय? सावधान!

औरंगाबाद - आजघडीला इंटरनेट अनेकांच्या आयुष्याचा भाग बनले आहे; मात्र याच इंटरनेटच्या अति वापराचे काहींना व्यसन लागले आहे. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. एवढेच नाही तर योग्य काळजी घेतली नाही, तर खासगी माहिती उघड होण्याच्या भीतीसह जमापुंजीलाही धोका निर्माण झाला आहे.

आधुनिक जीवनशैलीत सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. याशिवाय बातम्या, वस्तूंच्या खरेदी-विक्री आणि बॅंकिग व्यवहारासाठीही इंटरनेटचा वापर वाढला आहे. आपल्या या ऑनलाइन हालचालींवर हॅकर्स लक्ष ठेवून आपल्या आवडीनिवडी आणि इतर माहिती मिळवतात. त्यानंतर तिचा गैरवापर करतात. या बाबतच्या तक्रारीतही प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, अनेक जण इंटरनेटचे ॲडिक्‍ट झाले आहेत. त्यांना यापासून दूर करणारी व्यसनमुक्ती केंद्रं आज मोठ्या शहरात सुरू झाली आहेत. यात समुपदेशन, औषध, मानसोपचार, योगाभ्यास यांच्या साह्याने इलाज केला जात आहे.

इंटरनेट ॲडिक्‍टची लक्षणे व आजार 
दिवसरात्र मोबाईलवर नेट सुरू ठेवून कुणी जर कामाव्यतिरिक्त केवळ मनोरंजन आणि जास्तीत जास्त लाईक मिळावे, यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सॲप, ट्‌विटरवर भरमसाट फोटो टाकत असेल, सेल्फी काढून पोस्ट करीत असेल अशा व्यक्तींपासून काही तास मोबाईल किंवा लॅपटॉप दूर केल्यास तिची चिडचिड होते. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता राहत नाही. दैनंदिन व्यवहार, कामकाजातील कार्यक्षमता ढासळते. पाठदुखी, खांदेदुखी, बोटं बधिर होऊन वाकडी होणं, डोळ्यांची आग होणं, डोकं दुखणं, झोप न लागणे, दृष्टी कमकुवत होणं हे विकार होतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे आजारही बळावतात. 

काय काळजी घ्याल?
फेसबुक लॉगिन केल्यावर होमपेजच्या उजव्या बाजूला असलेल्या सेटिंग्जवर क्‍लीक करा. त्यामध्ये जनरल, सेक्‍युरिटी आणि लॉगिन, प्रायव्हसी, टाइमलाइन व टॅगिंग असे रचना असते. त्यात सेक्‍युरिटी आणि लॉगिनवर क्‍लीक केल्यावर सेटिंग अप एक्‍स्ट्रा सेक्‍युरिटी हा पर्याय निवडून यूज टू फॅक्‍टर ऑथंटिकेशनवर क्‍लिक करून मोबाईलनंबर टाका. ज्यावर फेसबुक लॉगिन करताना एक कोड येईल, तो कोड तुमचा फेसबुकचा पासवर्ड हे दोन्हीही वापरून फेसबुक लॉगिन करू शकाल. 

अनोळखी मेल व्यक्तीकडून किंवा सोशल मीडियावर आलेल्या अनोळखी यूआरएल क्‍लिक करून नका. बऱ्याच वेळा मोफत डाटा मिळावा, केंद्र सरकारच्या योजनेसाठी नाव नोंदणी करा, आगामी निवडणुकीत कोण जिंकणार मत व्यक्त करा, असे सांगत आपल्याला अनोळखी यूआरएलवर क्‍लिक करायला भाग पाडले जाते; पण अशाने आपली माहिती संबंधित बेवसाईटकडे जाते. 

असे आहे हॅकिंग तंत्र 
फिशिंग - यात हॅकर्स फेसबुकच्या लॉगिन पेजसारखे फेक लॉगिंग पेज बनवून त्या व्यक्तीच्या ई-मेलवर खोट्या पेजची यूआरएल (लिंक) पाठवतात. जेव्हा ती व्यक्ती लॉगिन आयडी, पासवर्ड त्या फेक पेजवर टाइप करते तेव्हा तिचा ई-मेल पत्ता, पासवर्ड हॅकरला मिळतो. अशा रीतीने वापरकर्त्याचे फेसबुक अकाऊंट हॅक केले जाते. फिशिंगचा वापर करून गोपनीय माहिती चोरणे दंडनीय अपराध आहे.

की-लॉगर - हॅकर्स विविध सॉफ्टवेअर तसेच फोटोंमधून या प्रोग्रॅमचा प्रसार करतात. हा प्रोग्रॅम यूजरच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल झाल्यानंतर यूजर्सचे सर्व डिटेल्स रेकॉर्ड करतो. यूजर्सचे हे डिटेल्स हॅकर्सला ई-मेल पत्त्यावर पाठविले जातात. त्यातून ब्लॅकमेल करण्याचेही प्रकार घडले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com