महाविद्यालयच करीत होते पेपर मॅनेज!

मनोज साखरे
गुरुवार, 18 मे 2017

तीन वर्षांपासून सुरू होता पेपर सोडविण्याचा "उद्योग'
पास होण्याची मिळत होती हमी
उच्चपदस्थांवरही येणार टाच

तीन वर्षांपासून सुरू होता पेपर सोडविण्याचा "उद्योग'
पास होण्याची मिळत होती हमी
उच्चपदस्थांवरही येणार टाच

औरंगाबाद - साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्‍नॉलॉजीमध्ये हमखास प्रवेश घ्या अन्‌ निश्‍चिंत राहा, आम्ही पास करू असाच प्रकार गेली काही वर्षे सुरू होता. हे महाविद्यालयच पेपर मॅनेज करीत होते. तीन वर्षांपासून हा काळा उद्योग सुरू होता. विशिष्ट रक्कम घेऊन विद्यार्थ्यांना पासही करून दिले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिसांनी छापा टाकून साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्‍नॉलॉजीच्या 27 विद्यार्थ्यांना पेपर सोडविताना पकडले. त्यानंतर या महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांना पास करण्याची जबाबदारी संस्थेवर होती. त्यासाठी अख्खी संस्थाच कामाला लागायची. प्राचार्य, प्राध्यापकांसह, कस्टोडियन व चक्क संस्थाचालकाचे हात यात बरबटले. या महाविद्यालयात बहुतांश विद्यार्थी हे पार्टटाईम शिक्षण घेणारे आहेत. त्यामुळे ते नियमित महाविद्यालयात येत नसत. एखाद्या विद्यार्थ्याने अभियांत्रिकीला प्रवेश घेतला, की पेपरसाठी काहीतरी करू, असे आश्‍वासन महाविद्यालयातर्फे दिले जात. काही दिवस उलटल्यानंतर विद्यार्थ्यांना पास करून देण्याची हमीही मिळत होती. त्यासाठी रेटकार्डनुसार, विद्यार्थ्यांकडून पैसेही वसूल केले जात होते. विद्यार्थ्याने पैसे दिल्यानंतर परीक्षेवेळी महाविद्यालयाची संपूर्ण यंत्रणा कामाला लावली जात होती. खासकरून रात्रीच्या वेळी पेपर सोडविले जात होते.

शिक्षणक्षेत्रातील बड्या धेंडांसोबतच राजकीय वजन वापरून विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्याची व्यवस्था केली जात होती.

आठवड्यात तीनवेळा पेपर मॅनेज
गेल्या आठवड्यात तब्बल तीनवेळा पेपर मॅनेज करण्यात आले होते. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकारादरम्यान अनेकदा संस्थेच्या "उद्योगा'ची माहिती समोर आली; परंतु त्या वेळी संस्थाचालकाकडून सर्व बाबी व्यवस्थितरीत्या मॅनेज करण्यात आल्या होत्या.

पैशासोबत पेपरला फुटायचे पाय...
बहुतांश विद्यार्थी शहराबाहेरील असल्याने त्यांना नापास होण्याबाबत भीती होती. परीक्षा सुरळीत पार पडून पास व्हावे, यासाठी तेही प्रयत्नशील होते. संस्थेच्या प्राध्यापकांकडूनच पास करण्याची ऑफर दिली जात होती. विद्यार्थ्याने पैसे दिल्यानंतरच त्याचा पेपर पुन्हा सोडविण्यासाठी क्रमांकाचा आधार घेऊन बाहेर काढला जात होता.

असे होते रेटकार्ड
अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षासाठी वीस ते बावीस हजारांचे घेत होते पॅकेज.
विषयानुसार उकळत होते पैसे, अंतिम सत्रासाठी जास्त रेट
गणित विषयासाठी सात हजार
"बिल्डिंग कन्स्ट्रक्‍शन'साठी पाच हजार
सोप्या पेपरसाठी तीन हजार

Web Title: paper manage by college