कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक गणपती

कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक गणपती

औरंगाबाद - सार्वजनिक गणेशोत्सव आता अवघ्या काही आठवड्यांवर आलेला आहे. गणेशोत्सवादरम्यान मूर्ती, डेकोरेशन आणि निर्माल्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी अनिरुद्ध उपासना केंद्रातर्फे कागदाच्या लगद्यापासून गणपतीच्या पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्या जातात. त्यामुळे प्रदूषण कमी होते, असे मत सिडकोतील अनिरुद्ध उपासना केंद्राचे समन्वयक जयंतसिंह पावडे यांनी व्यक्‍त केले. 

 
श्री. पावडे म्हणाले, की अनिरुद्ध युनिव्हर्सल बॅंक ऑफ रामनाममध्ये दरवर्षी हजारोंच्या संख्येने रामनाम लिहिलेल्या वह्या जमा होतात. या वह्यांची चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मागील पाच वर्षांपासून या कागदांच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले. औरंगाबादमध्ये सिडको, चिकलठाणा, कुंवारफल्ली, वाळूज, सहकारनगरसह सात ठिकाणी अनिरुद्ध उपासना केंद्राचे काम चालते. दरवर्षी कागदाचा लगदा प्रत्येक केंद्रामध्ये तयार होत असे. मात्र, यावर्षीपासून हा लगदा मुंबईला एकाच ठिकाणी तयार केला जातो. दीडशे ग्रॅम लगदा, अडीचशे ग्रॅम व्हाईटींग पावडर आणि 100 ग्रॅम डिंक वापरून एक किलोचा एक पुडा तयार केला जातो. मुंबईतून राज्यातील सर्व उपासना केंद्रावर गरजेनुसार या लगद्याचे पुडे पाठविले जाते. 


एक किलो लगद्यापासून साडेआठ इंचाची एक गणपती मूर्ती तयार केली जाते. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे वजनाने हलकी आणि विरघळण्यास सोपी. औरंगाबादमध्ये सात केंद्रातील स्वयंसेवक आपली नोकरी व व्यवसाय सांभाळून मे महिन्यापासून मूर्ती बनविण्याचे काम सुरू करतात. चार ते पाच महिन्यांत प्रत्येक दीडशे ते दोनशे प्रमाणे बाराशे ते चौदाशे मूर्ती तयार होतात. दोन ते तीन तास उन्हामध्ये या मूर्ती सुकविल्यानंतर त्याला आकार दिला जातो. त्यानंतर फुलांपासून तयार केलेल्या रंगाने या मूर्ती रंगविल्या जातात. औरंगाबादमध्ये साडेआठ आणि साडेदहा इंचामध्ये दोन प्रकारच्या मूर्ती बनविल्या जातात. मुंबईच्या उपासना केंद्रात सात फुटांपर्यंत मूर्ती व डेकोरेशनचे साहित्य तयार केले जाते. प्रत्येक उपासना केंद्रावर मूर्ती तयार करण्यासाठी साधारणत: वीस जण परिश्रम घेतात.
 

अर्ध्या तासात मूर्ती विरघळते
विसर्जनाच्या दिवशी सर्वजण आपापल्या घरातील बादलीमध्ये गणपतीचे विसर्जन करतात. ही मूर्ती अवघ्या अर्ध्या तासात विरघळते. विरघळलेल्या मूर्तीचे पाणी झाडांना घालतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. ज्या कोणा गणेशभक्‍तांना कागदापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करावयाच्या असतील, त्यांना उपासना केंद्रामार्फत मोफत प्रशिक्षण देऊ, असेही श्री. पावडे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com