परभणीत वीज कंपनीची साडेआठ लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

परभणी - वीज ग्राहकांच्या मीटरची चुकीची रीडिंग घेऊन वीज वितरण कंपनीस साडेआठ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन खासगी कंपन्यांच्या मालकांसह कर्मचाऱ्यांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी - वीज ग्राहकांच्या मीटरची चुकीची रीडिंग घेऊन वीज वितरण कंपनीस साडेआठ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन खासगी कंपन्यांच्या मालकांसह कर्मचाऱ्यांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज वितरण कंपनीच्या वतीने शहरातील औद्योगिक व घरगुती ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेण्याचे काम येथील मे. याम मल्टिसर्व्हिसेस व तिरुमला मल्टिसर्व्हिसेस या दोन खासगी कंपन्यांना देण्यात आले होते. यात मे. याम मल्टिसर्व्हिसेसचे मालक अब्दुल सिद्धीकी अब्दुल मोहीद यांनी औद्योगिक व व्यापारी विद्युत ग्राहकांचे रीडिंग कमी दाखवून वीज कंपनीला चार लाख 12 हजार 250 रुपयांचा गंडा घातला.

तसेच मे. तिरुमल्ला मल्टिसर्व्हिसेस परभणीचे मालक स्वप्नील भारती यांनीही कमी रीडिंग घेऊन वीज कंपनीस चार लाख 39 हजार 90 रुपयांना फसविले. याप्रकरणी शनिवारी (ता. 10) महावितरणच्या वतीने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून दोन्ही खासगी कंपन्यांच्या मालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.