कृषी विद्यापीठाचा यांत्रिकीकरणावर भर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

आंतरमशागतीसह कमी खर्चातील काढणी यंत्र विकसित

परभणी - शेतीला यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय राहिला नसल्याने दरवर्षी कृषी विद्यापीठात नवीन तंत्रज्ञान शोधले जात आहे. मागील वर्षभरात परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने चार कृषी यंत्र निर्माण केले आहेत. मराठवाड्यात हळदीचे वाढते क्षेत्र लक्षात घेता आंतरमशागतीसह कमी खर्चातील काढणी यंत्र विकसित केले आहे.

आंतरमशागतीसह कमी खर्चातील काढणी यंत्र विकसित

परभणी - शेतीला यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय राहिला नसल्याने दरवर्षी कृषी विद्यापीठात नवीन तंत्रज्ञान शोधले जात आहे. मागील वर्षभरात परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने चार कृषी यंत्र निर्माण केले आहेत. मराठवाड्यात हळदीचे वाढते क्षेत्र लक्षात घेता आंतरमशागतीसह कमी खर्चातील काढणी यंत्र विकसित केले आहे.

मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधन विभागाच्या वतीने दरवर्षी मराठवाड्यातील पीक रचनेनुसार यंत्राची निर्मिती केली जात आहे. मजुरांची वाढती टंचाई लक्षात घेता यांत्रिकीकरणावर भर देण्याचा प्रयत्न विद्यापीठाने सुरू केला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या पिकांचे २० यंत्र तयार केले आहेत.

यंदाच्या कृषी विकास व संशोधन समितीच्या बैठकीत परभणी विद्यापीठाच्या चार कृषी यंत्राना मान्यता मिळाली आहे. त्यात ऊस आणि हळद पिकाच्या आंतरमशागतीसाठी बैलचलित औजार निर्माण केले आहे. हे औजार दोन ओळीतील अंतर ९० ते १२० सेंटिमीटर असलेल्या पिकात वापरता येते, ऊस व हळदमधील आंतरमशागत, बाळ बांधणी, मोठी बांधणी करण्यासाठी उपयोगात येते. तसेच खताची उपयुकत्ता वाढवते. एका बैलावर चालणारे आणि कमीअंतर असणाऱ्या पिकांची आंतरमशागत करण्यासाठी वखर तयार केले आहे. तसेच एका बैलाच्या साह्याने कोळपणी, खत देण्यासाठी वापर व्हावा यासाठी दुहेरी कोळपे निर्माण केले आहे. एकाच वेळी कोळपणी आणि खते तेही एकाच बैलाच्या साह्याने देता येते हे कोळप्याचे वैशिष्ट्य आहे. मराठवाड्यात गादीवाफ्यावर हळद आणि आल्याचे पीक घेतले जात आहे. त्यासाठी काढणी यंत्र तयार करण्यात आले. ०.९० ते १.५० मीटर रुंदीच्या गादीवाफ्यावरील १८ ते १९ सेंटिमीटर खोलीवरील हळद व आले काढता येते. पारंपरिक पद्धतीपेक्षा ही दोन्ही पिकांच्या काढणी खर्चात ४० ते ५५ टक्के बचत होते. हेक्टरी ६६८ रुपये एवढा काढणी खर्च येत असल्याचे विद्यापीठाने सिद्ध केले आहे. 

आतापर्यंत विद्यापीठाने भुईमूग शेंगा तोडणी, शेंगा फोडणी यंत्र, धसकटे गोळा करणारे यंत्र, पोते भरण्यासाठी स्टॅंड, शेंगगा काढणीचे डिगर, खत कोळपे, दातेरी हात कोळपे, हात कोळपे, सुधारीत लोखंडी तिफन, पेरणी यंत्र, बैलचलीत फवाररणी यंत्र अशी विविध २० प्रकारची यंत्र विकसित केली आहेत.

शेतकऱ्यांचे शेतीतील कष्ट कमी करून मशागत व काढणी खर्चात बचत करण्यासाठी विद्यापीठ अशा यंत्राच्या संशोधनावर भर देत आहे. शेतकऱ्यांनी विद्यापीठ संशोधित यंत्राचा वापर केला पाहिजे.
- डॉ. दत्तप्रसाद वासकर, संशोधक संचालक कृषी विद्यापीठ.