शेतकरी आत्महत्यांमागची कारणे शोधा - मंत्री फुंडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

परभणी - शेतकरी आत्महत्यांमुळे राज्यावर बदनामीचे खापर फोडले जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांप्रश्‍नी सर्वांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जगाचा पोशींदा असलेला शेतकरी या वाटेवर का जातो,? याची कारणे शोधण्याचे आव्हान कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञांनी स्वीकारले पाहिजे, असे मत कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची पंचेचाळीसावी बैठक येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सोमवारपासून सुरू झाली. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीचे उद्‌घाटन फुंडकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे, कृषि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार, राज्याचे कृषि आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. जी. दाणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्‍वनाथ, येथील कुलगुरु डॉ. बी. व्यंकटेश्वरलू आदी उपस्थित होते.

फुंडकर म्हणाले, 'शेतीचे उत्पादन वाढले परंतु शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. शेतकरी आत्महत्या ही राज्यासाठी चिंतेची बाब आहे. कृषी विद्यापीठांचे काम हे मनुष्यबळ निर्मितीचे नसून अधिकाधिक संशोधनाचे आहे.

विद्यार्थ्यांना शिकवणे हा याच कामाचा भाग आहे. वेगवेगळ्या संशोधनावर भर देण्यासह प्रमुख पिकांच्या कमी पाण्यावरील वाणाची निर्मिती करण्याची सुचना त्यांनी केली. पशुधन वाढवून शेतीचे यांत्रिकीकरण करण्याची गरज आहे.''

मी पणनमंत्री नसतानाही तूरखरेदीप्रश्‍नी मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. येत्या चार जूनला केंद्रीय कृषि मंत्री राधामोहनसिंह हे नागपुरला येत असून त्यांच्याशी याप्रश्‍नी बोलणार असल्याचे फुंडकर यांनी सांगितले. दरम्यान, ही बैठक 31 मेपर्यंत चालणार असून चारही विद्यापीठांतील शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. बैठकीत विविध विषयांवर मंथन होणार असून शिफारशी मांडल्या जाणार आहेत.