परभणीत रूळ तुटल्याने इंजिन घसरले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

परभणी - येथील रेल्वे स्थानकापासून दोनशे मीटर अंतरावर, विद्यापीठ गेटजवळ रविवारी नवीन रूळ तुटल्याने मालगाडीचे इंजिन घसरले. यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. दुपारी साडेतीननंतर काही रेल्वेंना एक ते तीन तास उशिराने सोडण्यात आले. रेल्वे इंजिनची जोडणी करण्यासाठी एक किलोमीटर अंतराचा नवीन रूळ दोन महिन्यांपूर्वी टाकण्यात आला आहे. दीड महिन्यापासून त्यावर सेंटिंग सुरू होती.

नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी साडेनऊ वाजता मनमाडकडून आलेल्या मालगाडीच्या इंजिनाची जोडणी सुरू असताना हा रूळ तुटला. तो बाजूला सरकल्याने इंजिनही जमिनीवर घासले. चालकाने तत्काळ इंजिन बंद केले. यामुळे रेल्वेगाड्या परभणी, पिंगळी, मिरखेल (ता. परभणी) रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या.