परभणीत तुंबले नाले... स्वच्छता कर्मचारी फिरकेनात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

मनपाच्या स्वच्छता विभागाला स्वच्छतेचाच पडला विसर

काही नगरसेवक लागले कामाला...
नवनिर्वाचित अनेक नगरसेवक कामाला लागले तर काही जन अद्यापही विजयाचा आनंदोत्सवच साजरा करीत असून घराबाहेर देखील पडलेले नाहीत. जे कामाला लागले ते आपल्या घराजवळच्या परिसरातून बाहेर पडले नाहीत. तेथील स्वच्छता व अन्य कामांनांच त्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येते.

 

परभणी : महानगरपालिकेचे आयुक्त राहुल रेखावार यांनी स्वच्छता विभागातील प्रत्येक स्वच्छता कामगार-कामाठ्यांना नाल्या-रस्ते साफ करण्याचे दररोजचे वेळापत्रक दिलेले असतांना निवडणूका झाल्यानंतरही हे स्वच्छता कर्मचारी अद्याप नेमूण दिलेल्या शहरातील अनेक प्रभागात फिरकले देखील नसून त्यामुळे अनेक वसाहतीतील नाल्या केरकचऱ्याने तुडूंब भरल्या आहेत.

महानगरपालिकेचे आयुक्त राहुल रेखावार यांनी प्रत्येक स्वच्छता कामगार-कामाठी,कामाठण यांना दररोजचे वेळापत्रक दिलेले आहे. कोणत्या भागात कुठून-कुठपर्यंत नाली काढायची, अथवा रस्ते झाडायचे हे निश्चित केलेले आहे. महानगरपालिकेच्या निवडणूका होत्या, स्वच्छता कामगारांना अन्य कामे लागली असतील म्हणून नागरीकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु निवडणूका झाल्या, पदस्थापना झाल्या, तरी सुध्दा अनेक प्रभागात हे कामगार फिरकले देखील नसल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान जोमात सुरु आहे. शहर पांदण मुक्त कऱण्यासाठी आयुक्तांसह काही अधिकारी रात्रीचा दिवस करत आहे. चार दिवसापुर्वीच पदभार घेतलेल्या स्वतः महापौर मीनाताई वरपुडकर या देखील झपाटून कामाला लागल्या आहेत.

शहराला पांदणमुक्त करण्यासाठी शहरभर फिरत आहेत. आढावा बैठकातून माहिती घेत आहेत. आयुक्त तर पायाला भिंगरी बांधल्यागत पहाटे पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत शहराच्या विविध भागात फिरून शौचालय बांधकामांची पाहणी आढावा घेत आहेत, उघड्या मैदानावर शौचाला जाणाऱ्या नागरीकांचे प्रबोधन करीत आहेत. तर अन्य शेकडो कर्मचारी त्यामध्ये गुंतले आहेत. स्वच्छता कामगारांना शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होईल म्हणून या अभियानात घेतले सुध्दा नाही, अशी माहिती असून मग हे कामगार-कमर्चारी व त्यावर देखरेख ठेवणारे अधिकारी जातात तरी कुठे ? करतात तरी काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची वाणवा...
स्वच्छता विभागावर देखरेख ठेवणारे अनेक अधिकारी, कर्मचारी स्वच्छ अभियानात गुंतल्यामुळे या विभागावर सध्या कुणाचेही नियंत्रण दिसून येत नाही. एकीकडे घंटागाडी वाहन चालकांचा संप सुरु तर दुसरीकडे हे कामगार येत नसल्यामुळे नागरीकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गजानननगरात नाल्या तुंबल्या..
कारेगाव रस्त्यावरील गजानननगर परिसरात गेल्या महिन्या-दिड महिण्यापासून स्वच्छता कामगार न आल्यामुळे अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्या आहेत. घंटागाड्या देखील बंद झाल्या आहेत. गेल्या दिड महिण्यापासून या भागातील नाल्यांची देखील साफसफाई झाली नाही. त्यामुळे नागरीकांना मोठ्या त्रालासा तोंड द्यावे लागत आहे.