परभणी जिल्ह्यात लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

शेतीचा फेर लावून देण्यासाठी साडेतीन हजारांची लाच स्वीकारताना एक तलाठी रंगेहाथ सापडला आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने आज (बुधवार) जिंतूर शहरात ही कार्यवाही केली.

जिंतूर (जि. परभणी) - शेतीचा फेर लावून देण्यासाठी साडेतीन हजारांची लाच स्वीकारताना एक तलाठी रंगेहाथ सापडला आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने आज (बुधवार) जिंतूर शहरात ही कार्यवाही केली.

जिंतूर तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने त्यांच्या पुतण्यास शेती विकली. तिचा फेर पुतण्याच्या नावावर लावायचा होता. त्यासाठी चामणी सज्जाचे (ता.जिंतूर) तलाठी शाहूराव मदनराव पौळ यांनी संबंधीत शेतकऱ्याकडे चार हजारांची लाच मागितली. ती देण्याची इच्छा नसल्याने या शेतकऱ्याने परभणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागात धाव घेवून या प्रकरणी तक्रार दिली. त्याप्रमाणे भ्रष्टाचार निर्मूलन पथकाचे पोलिस अधीक्षक संजय लाटकर, उपाअधिक्षक एन.एन. बेंबडे यांनी सापळा रचला. दरम्यान, तडजोडीअंती पौळला साडेतीन हजारांची लाच देण्याचे निश्‍चित झाले. ठरल्याप्रमाणे आज बंजारा कॉलनीतील (ता. जिंतूर) खाजगी कार्यालयात संबंधित शेतकऱ्याकडून साडेतीन हजारांची लाच स्वीकारताना पौळला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर पौळ यांच्याविरूद्ध जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक विवेकानंद भारती, हवालदार लक्ष्मण मुरकुटे, शिवाजी भोसले, पोलिस नाईक लक्ष्मण उपलेंचवार, सचिन गुरसूडकर, शिपाई माणिक चट्टे, चालक भालचंद्र बोके यांनी ही कारवाई केली. भारती अधिक तपास करीत आहेत.