अखेर परभणीचे माजी आमदार बोर्डीकर भाजपमध्ये

गणेश पांडे
बुधवार, 17 मे 2017

परभणी जिल्ह्यातील कॉग्रेसचे बलाढ्य नेते म्हणून परिचित असलेले तथा जिंतूर विधानसभेचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना गेल्या दोन-तीन महिन्यांपासून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्याचे वेध लागले होते. जिल्हा परिषद पाठोपाठ जिंतूर व सेलू नगरपालिकेत कॉग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

परभणी - गेल्या दोन महिन्यापासून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी अतुरलेले कॉग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यावर अखेर देवेंद्रची कृपा झाली आहे. मंगळवारी (ता.16) दिवसभराच्या प्रतिक्षेनंतर मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत रात्री उशीरा रामप्रसाद बोर्डीकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.

परभणी जिल्ह्यातील कॉग्रेसचे बलाढ्य नेते म्हणून परिचित असलेले तथा जिंतूर विधानसभेचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना गेल्या दोन-तीन महिन्यांपासून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्याचे वेध लागले होते. जिल्हा परिषद पाठोपाठ जिंतूर व सेलू नगरपालिकेत कॉग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही निवडणुका माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या गेल्या होत्या. परंतू या दोन्ही निवडणुकामध्ये कॉग्रेसला म्हणावे तसे यश आले नाही.

तेव्हापासूनच रामप्रसाद बोर्डीकरांना भाजपचे डोहाळे लागले होते. भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी बोर्डीकरांसह त्यांच्या कन्या मेघना साकोरे - बोर्डीकर यांचे मुंबईला अनेक दौरे झाले. सुरुवातीला मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याचे फोटो देखील सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले. त्यानंतर सर्वच प्रसिध्दी माध्यमांनी बोर्डीकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त दिले होते. यावेळी बोर्डीकरांनी कॉग्रेसमध्ये आता राम उरला नाही म्हणत आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगून टाकले होते. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधील नेत्यांनी विरोध केला होता.

माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे यांनी जिंतूरात पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोर्डीकरांच्या भाजप प्रवेशाला विरोध दर्शविला होता. त्यामुळे बोर्डीकरांनी देखील रेल्वे रुळ बदलतांना खडखडाट होणारच ...! असे सांगून आपला भाजप प्रवेश निश्चित असल्याचे स्पष्ट केले होते. मंगळवारी (ता.16) सकाळी 11 वाजता रामप्रसाद बोर्डीकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संदेश सोशल मिडियावर व्हायरल झाले. परंतू मंगळवारी दिवसभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असलेल्या बैठकामुळे त्यांचा प्रवेश काही तासासाठी लांबला गेला. रात्री उशीरा त्यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन तथा माजी आमदार कुंडलीकराव नागरे, मेघना साकोरे - बोर्डीकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Parbhanis Former Congress MLA Ramprasad Bordikar in BJP