‘परिवर्तन’सह ‘शुभकल्याण’चा गुंतवणूकदारांना २६ कोटींचा गंडा

Crime
Crime

बीड - जादा व्याजदराचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून ठेवी गोळा करीत ‘शुभकल्याण’ व ‘परिवर्तन’ या मल्टीस्टेट बॅंकांनी त्यांचा गाशा गुंडाळला. जिल्ह्यात आतापर्यंत या दोन्ही मल्टीस्टेटवर एकूण १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांना तब्बल २६ कोटींचा गंडा घालून या मल्टीस्टेट बॅंकांनी हजारो ठेवीदारांची फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मल्टीस्टेटचे संचालक मंडळ गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे.

माजलगाव येथील परिवर्तन अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी व कळंब (जि. उस्मानाबाद) येथील शुभकल्याण मल्टीस्टेट या दोन्ही संस्थांनी जादा व्याजदर व ठेवींच्या सुरक्षेची हमी देणारी जाहिरातबाजी करून अल्पावधीतच सामान्यांचा विश्वास संपादन केला. मात्र ठेवीदारांनी गुंतवणूक केलेला पैसा मुदत उलटूनही परत देण्यास या संस्था असमर्थ ठरल्या. सहा महिन्यांपूर्वी शुभकल्याण मल्टीस्टेटमधील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला.

या संस्थेच्या संचालक मंडळासह अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सुरू झालेले गुन्ह्यांचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. शुभकल्याणवर माजलगाव शहर, आष्टी, केज, धारूर, नेकनूर, वडवणी, बीड शहर, गेवराई, अंबाजोगाई अशा एकूण १० ठिकाणी फसवणूक व अपहाराचे गुन्हे नोंद आहेत. या संस्थेने सुमारे १५ कोटींना गंडा घातल्याची माहिती उघड झाली आहे. याशिवाय परिवर्तन क्रेडिट को-ऑप. सोसायटीवर तीन महिन्यांपूर्वी पहिला गुन्हा नोंद झाला. त्यानंतर लागोपाठ गुन्हे दाखल होण्यास सुरवात झाली. आतापर्यंत जिल्ह्यात फसवणुकीचे ७ गुन्हे नोंद झाले आहेत. बीडमधील शिवाजीनगर, माजलगाव ग्रामीण, पाटोदा, माजलगाव शहर, तलवाडा, आष्टी व पिंपळनेर ठाण्यात गुन्हे नोंद असून, सुमारे ११ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही संस्थांनी मिळून जवळपास एक हजारापेक्षा अधिक ठेवीदारांना ‘टोपी’ घातली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतर्फे या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. मात्र, आतापर्यंत एकाही संचालकास अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश मिळालेले नाही.

ठेवीदारांचे हेलपाटे
शुभकल्याण व परिवर्तन मल्टीस्टेट दिवाळखोरीत निघाल्याने हजारो ठेवीदारांचे सुमारे २६ कोटी रुपये बुडाले आहेत. संचालक मंडळ गायब असून त्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने ठेवीदारांचा रोष वाढत आहे. कायदेशीर कारवाई करून ठेवी परत मिळविण्यासाठी ठेवीदारांचे पोलिस ठाणे व अधीक्षक कार्यालयात हेलपाटे सुरू आहेत.

‘ढोकेश्वर’कडूनही फसवणूक
ढोकेश्वर मल्टीस्टेटनेही बीडसह इतर जिल्ह्यांत जाळे निर्माण केलेले आहे. ही मल्टीस्टेटही परिवर्तन व शुभकल्याणच्या रांगेत येऊन बसली आहे. ढोकेश्वरच्या संचालक मंडळाविरोधात ठेवी परत न केल्यामुळे अंबाजोगाई येथे गुन्हा नोंद आहे. त्याचा तपासही आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे.

‘परिवर्तन’ व ’शुभकल्याण’वर अनुक्रमे सात व दहा गुन्हे नोंद आहेत. दोन्ही मल्टीस्टेटने मिळून ठेवीदारांना २६ कोटी रुपयांना फसविल्याचे उघड झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार मी नव्याने स्वीकारला आहे. संचालकांना पकडण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले जातील.
- प्रशांत शिंदे, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बीड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com