धनंजय मुंडेंचा आणखी एक जय!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

परळी बाजार समितीत स्पष्ट बहुमत, भाजपला केवळ चार जागा

परळी बाजार समितीत स्पष्ट बहुमत, भाजपला केवळ चार जागा
परळी वैजनाथ -  बीड जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले. समितीच्या 18 पैकी 14 जागा या पॅनेलने जिंकल्या. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे-खाडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते गोपीनाथ मुंडे शेतकरी विकास पॅनेलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. पंकजा मुंडे यांच्या पॅनेलचा दारुण पराभवाची जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे.

बाजार समितीच्या 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते. रविवारी (ता. 14) एक हजार 913 पैकी एक हजार 847 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 96.54 टक्के मतदान झाले होते. मतदानाचा टक्का वाढल्याने निकालाची मोठी उत्सुकता होती. येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या सभागृहात आज मतमोजणी झाली. निकाल ऐकण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनेलला बहुमत मिळताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. धनंजय मुंडे यांचा जयघोष करीत कार्यकर्त्यांनी आतषबाजी, गुलालाची उधळण केली. शहरात ठिकठिकाणी, चौकांतही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. श्री. मुंडे यांच्या येथील "जगमित्र' या संपर्क कार्यालयापुढेही दिवसभर आतषबाजी सुरू होती.

पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनेलमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे उमेदवार होते. दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होती. निकाल जाहीर होताच श्री. मुंडे, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. टी. पी. मुंडे, अजय मुंडे, वाल्मीक कराड, युवक नेते संजय दौंड, मोहनराव सोळंके, बालाजी मुंडे, बाजीराव धर्माधिकारी, प्रा. मधुकर आघाव, चंदुलाल बियाणी आदींनी मतमोजणीस्थळी विजेत्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमर शिंदे यांनी काम पाहिले. बाजार समितीचे प्रभारी सचिव बलवीर रामदासी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली.

विजयी उमेदवार
पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार, कंसात मिळालेली मते ः व्यंकटी परमेश्वर गित्ते (309), भाउसाहेब वामनराव नायबळ (320), राजाभाऊ यादवराव पौळ (312), ऍड. गोविंद विनायकराव फड (328), प्रा. विजय त्रिंबकराव मुंडे (313), सूर्यकांत रामकृष्ण मुंडे (306), सूर्यभान हनुमंत मुंडे (323), सिंधुबाई मदनराव गुट्टे (341), भाग्यश्री संजय जाधव (340), शिवाजी बाबूराव शिंदे (339), स्वाती माणिकराव फड (364), सीमिंता रामकिसन घाडगे (346), महानंदा ज्ञानोबा गडदे (340), सुरेश मदनराव मुंडे (113).
लोकनेते गोपीनाथ मुंडे शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार - जुगलकिशोर रामपालजी लोहिया (149), राजेभाऊ श्रीराम फड (343), जीवराज मारोती ढाकणे (356), मारोती ज्ञानोबा चाटे (138).

डाव-प्रतिडावाचे राजकारण
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, वैद्यनाथ सहकारी बॅंक आणि जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मात केली होती. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत परळी पट्ट्यात 9 पैकी 7 जागा जिंकून धनंजय मुंडे यांनी बाजी मारली होती. त्याशिवाय परळी नगरपालिकेच्या 31 पैकी 27 जागा जिंकून त्यांनी पंकजा मुंडे यांना शह दिला होता. आता बाजार समितीत मिळविलेल्या बहुमताने धनंजय यांच्या नावावर आणखी एक जय जमा झाला. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सत्तेच्या जवळ होता. पंकजा यांनी वेगळीच समीकरणे जुळवून सत्ता भाजपच्या पारड्यात टाकली. एकंदरीत स्थानिक निवडणुकांत भाऊ-बहिणीतील डाव-प्रतिडाव जिल्हावासीयांनी पाहिले.