गजानन महाराजांच्या पालखीचे परळीत जोरदार स्वागत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

परळी वैजनाथ - शेगाव (जि. बुलडाणा) येथून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी शनिवारी (ता. १७) सायंकाळी येथे आगमन झाले.

भाविकांच्या वतीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. रविवारी (ता. १८) या पालखीचा शहरातील संत जगमित्र नागा मंदिरात मुक्काम राहणार आहे.

परळी वैजनाथ - शेगाव (जि. बुलडाणा) येथून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी शनिवारी (ता. १७) सायंकाळी येथे आगमन झाले.

भाविकांच्या वतीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. रविवारी (ता. १८) या पालखीचा शहरातील संत जगमित्र नागा मंदिरात मुक्काम राहणार आहे.

ही पालखी ३० मे रोजी आषाढी यात्रेसाठी शेगावहून निघाली असून या पालखीत सुमारे आठशे वारकरी सहभागी झाले आहेत. पालखीचे यंदाचे ५० वे वर्ष आहे. शहरातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीत ही पालखी शनिवारी सायंकाळी दाखल झाली. या पालखीचे वीज केंद्राच्या परिसरात स्वागत करण्यात आले. या वेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे यांच्यासह विश्वंभर महाराज उखळीकर, पोलिस निरीक्षक रामकृष्ण चाटे, अशोक महाराज कराळे, ज्ञानेश्वर महारात कतारे, अविनाश महाराज शिंदे, सुरेश मोगरे, हनुमंत तोष्णीवाल, नामदेव महाराज गिरी, गोविंद मुंडे, वृक्षराज आंधळे, राधिका जायभाये, नगरसेविका शोभा चाटे, मंगल लिंगाडे, निर्मला नागरगोजे, सोपानकाका फड, श्री. थोरात, शिवरत्न मुंडे, प्रभाकर मुंडे, हनुमंत अवधूत, बबनराव गिराम, शंकर नागरगोजे यांच्यासह वीज केंद्राच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीनेही पालखीचे स्वागत करण्यात आले. 

ऊर्जानगर वसाहतीतील न्यू हायस्कूल शाळेत या पालखीचा मुक्काम असणार असणार आहे. रविवारी (ता.१८) सकाळी ही पालखी शहरात येणार असून शहरातील संत जगमित्र नागा मंदिरात या पालखीचा मुक्काम असणार आहे. शहराच्या मोंढा टॉवर, गणेशपार, अंबेवेस, वैद्यनाथ मंदिर मार्गेही पालखी जगमित्र नागा मंदिरात येणार आहे. दिवसभर जगमित्र नागा मंदिरात पालखीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. सोमवारी (ता. १९) सकाळी कन्हेरवाडी मार्गे अंबाजोगाईकडे पालखी मार्गस्थ होणार आहे.

शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर परळीकरांच्या वतीने स्वागत करण्यात येणार असून शहरातील मोंढा मैदानावर रविवारी सकाळी व्यापाऱ्यांच्या वतीने या पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे. दोन दिवसांच्या मुक्कामात भजन, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.