परळीतील वीजनिर्मितीचे दोन संच अचानक सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

विजेची मागणी वाढल्याने वीजनिर्मिती कंपनीचा निर्णय

विजेची मागणी वाढल्याने वीजनिर्मिती कंपनीचा निर्णय
परळी वैजनाथ  - वीजनिर्मितीचा खर्च परवडत नसल्याचे कारण पुढे करून गेल्या 17 जूनपासून बंद करण्यात आलेले येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील दोन वीजनिर्मिती संच मंगळवारी (ता. 8) अचानक सुरू करण्यात आले आहेत. राज्यात विजेची मागणी वाढल्यामुळे वीजनिर्मिती कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयाच्या आदेशानंतर हे संच सुरू करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

दोन वर्षांपूर्वीच्या दुष्काळात पाण्याअभावी येथील वीजनिर्मिती केंद्रातील सर्व संच बंद करण्यात आले. गेल्या वर्षी मुबलक पाऊस झाल्याने केंद्रातील प्रत्येकी 250 मेगावॉट क्षमतेचे तीन संच सुरू करण्यात आले. या तिन्ही संचांतून उल्लेखनीय वीजनिर्मिती सुरू असतानाच खर्चाचे कारण पुढे करून कंपनीच्या मुंबई कार्यालयाच्या आदेशावरून 17 जूनपासून वीजनिर्मिती बंद करण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपासून विदर्भ व मराठवाड्यात पावसाने उघडीप दिल्याने विजेची मागणी वाढली आहे. खासगी कंपन्यांची वीज घेऊनही ही तूट भरून निघत नसल्याने बंद संच चालू करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. सोमवारी (ता. 7) उशिरा परळीतील संच चालू करण्याचे आदेश येथील वरिष्ठांना देण्यात आले. वीज केंद्र बंद झाल्यामुळे दोन हजारांवर कंत्राटी कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. राख, विटा व सिमेंट उद्योगावरही याचा परिणाम झाला होता.