कार्यकर्त्यांकडूनच जालन्यात युतीसाठी आग्रह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

जालना : केंद्र, राज्यात सत्ता, जिल्ह्यात कॅबिनेट, राज्यमंत्री, खासदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष असूनही जिल्ह्यातील चारपैकी तीन नगरपालिका कॉंग्रेसच्या ताब्यात गेल्याने सेना-भाजपचे कट्टर कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. नेत्यांची फौज आणि ताकद असतानाही केवळ कचखाऊपणामुळे झालेला पराभव प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत तरी युती करा असे साकडे सेना-भाजपच्या या कार्यकर्त्यांनी नेत्यांना घालायला सुरवात केली आहे. 

नगरपालिका निवडणुकीतील पराभवाने युतीची अक्षरशः दाणादाण उडाली. नेत्यांनी स्वार्थी राजकारणापोटी ओढवून घेतलेला हा पराभव असल्याची टीका आता युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते करताना दिसत आहेत. या पराभवाची पुनरावृत्ती आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत होऊ नये यासाठी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. स्वबळाच्या आग्रहामुळे "मला न तुला घाल.....' अशी अवस्था झाल्याने आता युती करायचीच असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून त्यासाठी नेत्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

जिल्ह्यामधील चारही पालिका निवडणुकीत भाजप -शिवसेनेने युती करून लढावे अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा होती, पण "आले नेत्यांच्या मना त्या पुढे कुणाचे काही चालेना' प्रमाणे कार्यकर्त्यांनी लादलेले निर्णय निमूट मान्य केले. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी माघार घेतल्यानंतर भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने उपोषण करत दानवे यांची चौकशी करण्याची मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडेच थेट केली. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मात्र पक्षश्रेष्ठींना माघारीमागचे कारण पटवून दिले. त्यामुळे शिवसेनेकडून फारशी प्रतिक्रिया उमटली नसली तरी शिवसैनिकांच्या मनात राग कायम आहे. पुन्हा वाट्याला पराभव नको यासाठी दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या अगोदरच युती बाबत चर्चा करावी असा आग्रह दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांनी धरला आहे. 

जिल्हा परिषदेत भाजप -शिवसेना या दोन्ही पक्षात युती व्हावी अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा असली तरीही या बाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय अंतिम राहील असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेने युतीला विलंब केला, त्यामुळे कार्यकर्त्यांना मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उशीर झाला. अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवाराला फटका बसला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सतर्क राहून युती वेळेत करण्यासाठी पुढाकार घेतल्यास नगरपालिका निवडणुकीप्रमाणे वाताहत होणार नाही असे मत भाजपचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ कार्यकर्ते विलास नाईक यांनी व्यक्त केले.