पासपोर्ट केंद्रास पाडव्याला मुहूर्त

आदित्य वाघमारे
गुरुवार, 16 मार्च 2017

औरंगाबाद - पासपोर्टसाठी औरंगाबादकरांच्या मुंबई हेलपाट्यांना पूर्णविराम मिळणार आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर (ता.28) शहरात पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्‌घाटन होणार आहे. या कार्यालयाची पाहणी बुधवारी (ता.15) खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय पासपोर्ट अधिकारी स्वाती कुलकर्णी, पोस्टमास्टर जनरल प्रणव कुमार यांनी केली.

औरंगाबाद - पासपोर्टसाठी औरंगाबादकरांच्या मुंबई हेलपाट्यांना पूर्णविराम मिळणार आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर (ता.28) शहरात पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्‌घाटन होणार आहे. या कार्यालयाची पाहणी बुधवारी (ता.15) खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय पासपोर्ट अधिकारी स्वाती कुलकर्णी, पोस्टमास्टर जनरल प्रणव कुमार यांनी केली.

शहरातील पासपोर्ट कार्यालय बंद केल्याने प्रत्येकास कागदपत्रांच्या पडताळणीकरिता मुंबई वारी करावी लागते. ही मुंबईवारी आता एप्रिल महिन्यापासून बंद होणार आहे. छावणीतील पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात "पोस्ट पासपोर्ट सेवा केंद्र' मंगळवारपासून (ता.28) सुरू करण्यावर पासपोर्ट अधिकारी आणि खासदार खैरे यांनी सहमती दर्शविली. या कार्यालयात सुरवातीस औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांची सोय करण्यात येणार आहे. नागरिकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने अवाका जिल्ह्यापुरताच ठेवण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने या कार्यालयाचे क्षेत्र संपूर्ण मराठवाड्यापर्यंत वाढविण्याचा विचार विभागीय पासपोर्ट कार्यालयाकडून सुरू आहे. या पाहणीसाठी नॅशनल इन्फर्मेटिक्‍स सेंटरचे आर. के. मिश्रा यांची उपस्थिती होती. कार्यालयाच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय पासपोर्ट अधिकारी स्वाती कुलकर्णी यांनी दिली. असे असले तरी खासदार चंद्रकांत खैरे यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे पत्र प्राप्त झाले असून, या पत्रात खैरे यांनी हे उद्‌घाटन करावे, असा उल्लेख करण्यात आला आहे.

ऍण्डरॉईडच्या जोडणीसाठी खासदार निधी
पासपोर्ट कार्यालयाचा कारभार गतिमान करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर औरंगाबादेतही पोलिस व्हेरिफीकेशन ऑनलाइन करण्यासाठी विभागीय कार्यालय आग्रही आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याला ऍण्डरॉईड टॅबच्या साह्याने या यंत्रणेशी जोडल्यास पोलिस ठाण्यांमध्ये कागदपत्रे नेण्याचे काम राहणार नाही. त्याच्यामुळे पडताळणी सोपी होईल आणि वेळ वाचणार आहे. ही यंत्रणा उभारण्याबाबत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी खासदार खैरे, स्वाती कुलकर्णी यांनी संपर्क साधला. पोलिस आयुक्तांनी याला सहमती दर्शवली. या यंत्रणेसाठी खासदार निधी देण्यासाठी आपण तयार असल्याचे खासदार खैरे यांनी सांगितले.

किचकट, गुन्हेगारी प्रकरणे मुंबईला
औरंगाबादेतील पासपोर्ट सेवा केंद्रांमधून नवे पासपोर्ट मिळतील आणि जुन्यांचे नूतनीकरण करण्यात येईल. असे असले तरी किचकट आणि गुन्हेगारीशी निगडित प्रकरणे मुंबईकडे वर्ग करण्यात येणार आहेत. औरंगाबादेतील केंद्रात सुरवातीस ग्रॅण्टींग ऑफिसर उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे येथील कामे पूर्ण झाल्यावर फाइल शेवटच्या सहीसाठी मुंबईला जाणार आहे. पोलिस पडताळणी झाल्यानंतर आठ दिवसांत पासपोर्ट दिला जाईल, अशी यंत्रणा येथे राहणार आहे. ऑनलाइन पडताळणी झाल्यास हा कालावधी घटणार असल्याचे स्वाती कुलकर्णी म्हणाल्या.

कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात
पोस्ट पासपोर्ट सेवा केंद्राच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. 25 मार्चपूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार असून, पुढील तीन दिवसांत या कार्यालयातील यंत्रणा बसविण्याचे काम होणार आहे. त्याच्यासाठी लागणारे सर्व्हर, संगणक आणि अन्य यंत्रणा ही या कालावधीत उभाण्यात येणार असल्याचे स्वाती कुलकर्णी यांनी सांगितले. या कार्यालयासाठी पोस्टाने सुमारे एक हजार चौरस फुटांची जागा पासपोर्ट विभागास उपलब्ध करून दिली आहे. त्याच्यामुळे एप्रिल महिन्याच्या सुरवातीस शहरवासीयांना औरंगाबादेतच पासपोर्ट काढता येणार आहे.

Web Title: passport center