कर वसुलीआधी कचरा उचला! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

औरंगाबाद - चिकलठाणा भागात मालमत्ता कर वसुलीसाठी गेलेल्या पथकाला एका ज्येष्ठ नागरिकाने चांगलेच खडसावले. "आधी कचरा उचला आणि कर घ्या' अशी अट घातली. मेटाकुटीस आलेल्या पथकाने कचरा उचलणारी गाडी बोलावून घेतली आणि कचरा उचलला. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी 67 हजार रुपयांचा धनादेश दिला. 

औरंगाबाद - चिकलठाणा भागात मालमत्ता कर वसुलीसाठी गेलेल्या पथकाला एका ज्येष्ठ नागरिकाने चांगलेच खडसावले. "आधी कचरा उचला आणि कर घ्या' अशी अट घातली. मेटाकुटीस आलेल्या पथकाने कचरा उचलणारी गाडी बोलावून घेतली आणि कचरा उचलला. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी 67 हजार रुपयांचा धनादेश दिला. 

महापालिका आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे. यासाठी अतिरिक्‍त कर्मचारीवर्गही दिला आहे. बड्या थकबाकीदारांची यादी तयार करून जे थकबाकी भरणार नाहीत त्यांच्या मालमत्तांना सील ठोण्याचे आदेश दिले आहेत. मालमत्ता कर थकबाकीदारांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी किमान 50 टक्‍के तरी रक्‍कम घ्यावी. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हणजे वसुली करू नये असा अर्थ नव्हे, जर वसुली करण्यास स्थगिती असेल तरच वसुली करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे वसुली सुरू आहे. 

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये राज्य कामगार रुग्णालयासमोर एका छोट्या युनिटकडे दोन दिवसांपूर्वी वॉर्ड अधिकारी अजमतखान यांच्या नेतृत्वातील पथक दाखल झाले. त्या वेळी तेथील एक ज्येष्ठ नागरिकाने त्यांना खडसावले आणि महापालिकेची काय कर्तव्ये आहेत यावर त्यांचा पाठ घेतला. जोपर्यंत इथे पडलेला कचरा उचलला जाणार नाही तोपर्यंत कर भरणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अखेर त्या ठिकाणी कचरा उचलणारी गाडी बोलावून त्याच वेळी कचरा उचलण्यात आला. त्यावर त्या नागरिकाने आता उचलला ठीक केले; पण पुन्हा कधी येणार, असा सवाल केला, वेळ मारून नेण्यासाठी चार वाजता असे सांगण्यात आले त्यावर तेही वस्ताद निघाले. मग धनादेश चार वाजता देतो, असे सांगून पथकाला परत पाठविले; पण चार वाजता न पथक गेले न कचरा उचलणारी गाडी, मग वसुली पथक शुक्रवारी (ता. 24) पुन्हा तिथे पोचले; मात्र या वेळी सोबत पोलिस बंदोबस्तात. त्या वेळीही त्या ज्येष्ठाने पथकाला उपदेशाचे डोस पाजले आणि थकीत मालमत्ता कराचा 67 हजार रुपयांच्या रकमेचा धनादेश दिला. 

सेंट झेवियर शाळेचे कार्यालय सील 
सिडको एन- 1 येथील सेंट झेवियर शाळेकडे 42 लाख रुपयांचा कर थकल्याने कार्यालय सील करण्यात आले असल्याची माहिती आज देण्यात आली. 

Web Title: To pick up the waste before tax