नियोजित राष्ट्रीय महामार्ग वळण रस्त्याने न्यावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

लातूर - नियोजित नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग हा शहरातून नेण्याऐवजी शहराबाहेरून वळण रस्ता करून न्यावा, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन श्री. गडकरी यांनी आमदार देशमुख यांना दिले आहे.

लातूर - नियोजित नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग हा शहरातून नेण्याऐवजी शहराबाहेरून वळण रस्ता करून न्यावा, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन श्री. गडकरी यांनी आमदार देशमुख यांना दिले आहे.

शहरातून जाणाऱ्या नियोजित महामार्गामुळे जागेच्या अधिग्रहणाच्या अनेक समस्या निर्माण होणार आहेत. काही इमारती पाडण्यासोबत नव्याने होणाऱ्या बांधकामांवरही निर्बंध येणार आहेत. पर्यायाने शहराच्या विकासावरच मर्यादा येणार आहेत. वाहतुकीची कोंडी व प्रदूषणाचेही प्रश्न निर्माण होणार असल्याने हा महामार्ग शहरातून नेऊ नये, अशी नागरिकांची मागणी आमदार देशमुख यांनी श्री. गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. महामार्ग हा नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात येत आहे. त्यातून गैरसोय होणार असेल तर त्यावर विचार करून निर्णय घेण्याचे आश्वासन श्री. गडकरी यांनी आमदार देशमुख यांना दिले.

वळण रस्त्यावर उड्डाणपूल करा

शहरातून जाणारा नियोजन राष्ट्रीय महामार्ग व त्यावर उभारण्यात येणारा उड्डाणपूल रद्द करावा, हा महामार्ग शहराबाहेरून वळण रस्त्याने नेण्यात यावा व त्यावरच उड्डाणपुलाची उभारणी करावी, अशी मागणी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नवी दिल्ली येथील प्रमुख व्यवस्थापक अतुल कुमार यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी व ओएसडी श्री. देऊळगांवकर यांनी श्री. कव्हेकर यांची श्री. कुमार यांच्यासोबत दिल्ली येथील मंत्रालयात भेट घडवून आली. या वेळी शहरातून जाणारा नियोजित महामार्ग व त्यावरील उड्डाणपुलामुळे निर्माण होणाऱ्या बिकट प्रश्नांची जाणीव श्री. कव्हेकर यांनी श्री. कुमार यांना करून दिली. त्यावर विचार करण्याचे आश्वासन श्री. कुमार यांनी दिले आहे. यासोबत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी हा उड्डाणपूल रद्द करण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केल्याने त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची आशा श्री. कव्हेकर यांनी व्यक्त केली.