पोलिसांचे हाल; ना वेळेवर पाणी, ना जेवण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - मंत्रिमंडळ बैठकीसाठी शहरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावत राज्यभरातून साडेतीन हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त लावला; मात्र मंगळवारी (ता. चार) सकाळी सहापासून बंदोबस्तावर असलेल्या बहुतांश पोलिसांचे हाल झाले. त्यांना ना वेळेवर नाश्‍ता, ना जेवण मिळाले. साध्या पाण्याचीही व्यवस्था न करण्यात आल्याने दिवसभर बंदोबस्तात असलेले पोलिस मेटाकुटीला आले; मात्र ड्यूटी करायची असल्याने नाइलाजाने ते आपल्या ठिकाणावर रात्रीपर्यंत थांबून होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी शहरात सोमवारपासून (ता. तीन) शहरात तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जालना रोड, जळगाव रोड, सुभेदारी विश्रामगृह, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरास छावणीचे स्वरूप आलेले आहे. सोमवारपासून (ता. तीन) सुभेदारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय पोलिसांनी ताब्यात घेतले. येथे पोलिसांच्या ड्यूटी लावल्या. मात्र, त्यांच्या जेवण, पाण्याच्या व्यवस्थेकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. 

मंगळवारी (ता. चार) मंत्रिमंडळाची बैठक असल्याने सकाळी सहापासून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळीच आपापल्या ड्यूटीच्या ठिकाणी पोलिस उभे होते. मात्र, त्यांच्या नाश्‍त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सकाळच्या वेळी नाश्‍ता न मिळाल्याने अनेक पोलिसांनी जवळपास मिळेल ते खाऊन आपली भूक भागविली. आमखास मैदानाजवळ बंदोबस्तावरील पोलिस भेळ खात होते. अनेक महिला पोलिस तर जामा मशिदीसमोर विक्रीस आलेले नारळ खात होत्या. काहींना जागेवरून हलताच येत नसल्याने त्यांना उपाशीपोटी उभे राहावे लागले. आमखास मैदानाजवळ मोर्चे धडकणार असल्याने येथे पोलिसच पोलिस होते. मात्र, त्यांना साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध नव्हते. येथे दुपारून पिण्याच्या पाण्याचे टॅंकर मागविण्यात आले. एका गाडीत नाश्‍त्याचे पॉकीट पोलिसांना देण्यात येत होते. मात्र, ते पुरेसे नव्हते. त्या गाडीजवळ पोलिसांची झुंबड उडाली होती. दुपारच्या वेळी अनेक पोलिसांना आपल्या जागेवरून हलताच न आल्याने त्यांना उपाशीपोटी ड्यूटी करावी लागली. या सर्वांमध्ये महिला पोलिसांचेही खूप हाल झाले. पोलिस आयुक्तालयाने पोलिसांचा नाश्‍ता, जेवण, पाण्याच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने दिवसभर पोलिसांचे हाल झाले.