'पोलिस ठाण्याचे वातावरण घरात नको'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

लातूर - पोलिसांना ताणतणाव काम करावे लागते हे खरे आहे. पण या ताणतणावाचा परिणाम कुटुंबावर होऊ देवू नका. पोलिस ठाण्या सारखे वातावरण घरात ठेवू नका, असा सल्ला पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे. 

लातूर - पोलिसांना ताणतणाव काम करावे लागते हे खरे आहे. पण या ताणतणावाचा परिणाम कुटुंबावर होऊ देवू नका. पोलिस ठाण्या सारखे वातावरण घरात ठेवू नका, असा सल्ला पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे. 

येथे मंगळवारी (ता. 26) जिल्हा पोलिस दलाच्या वतीने अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, विकास नाईक, मिलिंद खोडवे, राजेंद्र उनवणे, पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, नानासाहेब उबाळे, सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर उपस्थित होते. 

घरात गेल्यानंतर आपले वागणे बदलले पाहिजे. तुमच्याकडून कुटुंबाची चांगल्या वागणुकीची माफक अपेक्षा असते. त्याकडे दुर्लक्ष करू नका. मुलासोबत मित्रत्वाचे नाते जपा. तरचे ते मोठे झाल्यानंतर तुमचे ऐकतील. शासनाने तुम्हाला सुट्ट्या दिल्या आहेत. त्याचा उपयोग इतरत्र न करता कुटुंबासोबत सहलीवर जाण्यासाठी करा. हे करीत असताना आपला मुलगा मुलगी कोणाच्या संगतीत आहे, यावर लक्ष ठेवा. 

तुमचे पाहूनच मुले वागत असतात. त्यामुळे तुम्हीच जर व्यसनी असाल तर मुलाकडून काय अपेक्षा करणार. मुलावर आतापासून लक्ष ठेवले तर ते हाताच्या बाहेर जाणार नाहीत. कुटुंबाच्या अडचणी समजून घ्याव्यात असे आवाहन डॉ. राठोड यांनी केले. पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाते कमी करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यातून हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. मुलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येईल. येत्या काळात तालुक्‍याच्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कुटुंबासह मेळावे घेण्यात येणार आहेत असे डॉ. राठोड म्हणाले. वडील पोलिस असले की ते आपल्याला वेळ देवू शकत नाहीत अशी प्रत्येकाची भावना असते. ती काढून टाकावी. खरे तर आपले वडील हे देशाची सेवा करीत असतात. आपली मान अभिमानाने उंच झाली पाहिजे, असे मत गुणवंत विद्यार्थिनी श्रुतिका भातलवंडे हिने व्यक्त केले. श्रीमती फड यांचेही भाषण झाले.