बोगस डॉक्‍टरकडून पोलिसांची नेत्रतपासणी!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

औरंगाबाद - पोलिस विभागाने आयोजित केलेले नेत्र तपासणी शिबिर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या शिबिरात चक्क बोगस डॉक्‍टरांकडूनच पोलिस व रिक्षाचालकांची तपासणी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यासंर्दभात नेत्ररोग डॉक्‍टरांनी आरोप केला असून शिबिर घेणारे विक्रम ठाकूर हे बोगस डॉक्‍टर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

औरंगाबाद - पोलिस विभागाने आयोजित केलेले नेत्र तपासणी शिबिर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या शिबिरात चक्क बोगस डॉक्‍टरांकडूनच पोलिस व रिक्षाचालकांची तपासणी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यासंर्दभात नेत्ररोग डॉक्‍टरांनी आरोप केला असून शिबिर घेणारे विक्रम ठाकूर हे बोगस डॉक्‍टर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त औरंगाबाद शहर पोलिसांनी पोलिस कर्मचारी व रिक्षाचालकांसाठी बुधवारी (ता. 18) व गुरुवारी (ता. 19) नेत्रतपासणी शिबिर घेतले. शिवकला नेत्रालयामार्फत हे शिबिर घेण्यात आले. यात पोलिस अधिकारी कर्मचारी व रिक्षाचालकांनी सहभाग घेतला. सहभागी झालेल्यांची डॉ.विक्रम ठाकूर व डॉ. हीना ठाकूर या दोघांनी दोन दिवस तपासणी केली. पण नेत्रतपासणी करणारे विक्रम ठाकूर डोळ्याचे डॉक्‍टर नाहीत. हीना ठाकूर यांनी एमएस ऑप्थोमेट्री ही पदव्युत्तर पदवी घेतली, असे सांगितले जात आहे. पण बीएचएमएस केल्याशिवाय एमएस ही पुढची पदवी घेता येत नाही. मग अशा डॉक्‍टरकडून तपासणी कशी काय केली, असा प्रश्‍न शहरातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्‍टरांनी केला आहे.

तसेच विक्रम ठाकूर यांची पात्रता नाही, दहा ते बारा वर्षांपासून ते प्रॅक्‍टीस करतात. शंभर डॉक्‍टर शहरात आहेत; पण त्यांनाच बोलावण्याचे कारण समजले नाही, विक्रम ठाकूर बोगस डॉक्‍टर असल्याचा आरोप नेत्ररोग तज्ञांच्या संघटनेने केला आहे.

पोलिसांतर्फे आयोजित नेत्र शिबिरात तपासणी करणारे विक्रम ठाकूर बोगस डॉक्‍टर आहेत. त्यांच्या पत्नी हीना यांच्याकडे मान्यताप्राप्त पदवी नाही. ते डॉक्‍टर्स मान्यताप्राप्त नसल्याने नेत्ररोगांचे निदानच करू शकत नाहीत. मग रुग्णांवर उपचार कसे करणार? नेत्ररोग डॉक्‍टर्स संघटनेकडे अनेक तज्ज्ञ डॉक्‍टर्स असताना बोगस डॉक्‍टरकडून का शिबिर भरवण्यात आले?
- सुनयना मलिक, अध्यक्ष, नेत्ररोग डॉक्‍टर्स संघटना

गत दहा वर्षांपासून चॅरिटेबल हॉस्पिटलच्या शिवकला नेत्रालयाचा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो. माझी पत्नी एमएस ऑप्थोमेट्री आहे. तिला कामात मदत करतो. मी "एमबीबीएस अल्टरनेटीव्ह मेडिसीन' केले आहे. म्हणून मी माझ्या नावाआधी डॉक्‍टर लावू शकतो. पण मी कोणत्याही प्रकारची प्रॅक्‍टीस करीत नाही. तांत्रिक कामे पत्नी बघते. मी पेशंटला तपासत नव्हतो. पत्नीच्या सान्निध्यात चष्म्याचा क्रमांक काढून देत होतो. असा नंबर प्रत्येक ऑप्टीकल्स दुकानदार काढतात.
- विक्रांत ठाकूर, आरोप झालेले डॉक्‍टर

डॉक्‍टरच्या व्यावसायिक पात्रतेसंबंधी प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. आम्ही इंडियन मेडिकल इन्स्टिट्युट (आएमए) व शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून अधिक माहिती घेत आहोत. असे शिबिर घेण्यासाठी काय पात्रता असावी हे पडताळत आहोत. त्यानंतरच पुढील पाऊल उचलले जाईल. शिबिर सकारात्मकतेने आयोजित केले, पण यात त्रूटी असेल तर त्या नजरचुकीने झाल्या असाव्यात.
- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त