बावकरांच्या मजबूत नेटवर्कने लागला लातुरमधील खूनाचा छडा

Sudhakar Bavkar
Sudhakar Bavkar

लातूर : पोलिस अधिकारी असल्याचा आव न आणता सामान्य लोकांत मिसळून राहिल्यामुळे नेटवर्क मजबूत झाले. याचा फायदा स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांना स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या खूनाचा तपास लावण्यासाठी झाला. या नेटवर्कमुळेच त्यांनी चोवीस तासाच्या आत गुन्ह्यांची उकल करून वरिष्ठांसह नागरिकांची शाबासकी मिळवली. 

पोलिस दलात सन 2007 मध्ये उपनिरीक्षक म्हणून दाखल झालेल्या बावकर यांनी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात परिविक्षाधीन अधिकारी म्हणून काम केले. या काळात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती देण्यात आली. दीड वर्षाच्या काळात त्यांनी अनेक गुन्हे उघड केले. यातच त्यांची गडचिरोली येथे बदली झाली. तेथून सहायक पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती घेऊन श्री. बावकर पुन्हा लातूरला परतले. किल्लारी व चाकूर येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम केल्यानंतर ते पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेत आले. तेथून ते एमआयडीसी पोलिस ठाण्यात व पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेत आले आहेत. तीन वर्ष त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेत काम केले आहे.

आतापर्यंत त्यांनी 55 खून, अकरा दरोडे, तीस जबरी चोऱ्यासह दीडशेहून अधिक घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. पोलिस अधिकारी म्हणून पदाचा अभिनिवेश न बाळगता सर्व घटकांतील लोकांत मिसळून काम करण्याचे त्यांचे कौशल्य आहे. त्यांचा मित्र परिवारही मोठा आहे. त्यांच्याकडे काम घेऊन आलेला व्यक्ती रिकाम्या हाताने परत जात नाही. चौकटीबाहेरील कामासाठी ते प्रभावी प्रयत्न करतात. विविध गुन्ह्यांत पकडलेल्या अनेक गुन्हेगारांचे त्यांनी पुनर्वसन केले आहे. याची जाणीव ठेऊन ही मंडळी त्यांना तपासात मदत करतात. मोठ्या संख्येने गुन्ह्यांचा तपास केल्याने त्याचे गुन्ह्यांचे प्रकार व गुन्हेगारांच्या वर्तनांचा त्यांचा चांगला अभ्यास झाला आहे. स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून हत्या झाल्यानंतर त्यांनी आपले नेटवर्क कामाला लावले आणि चोवीस तासात पकडले गेले.

अधिकारी पदाचा गर्व न बाळगता लोकांत मिसळून काम केल्यामुळे अनेकजण जोडले गेले. गरीब - श्रीमंत असा भेद न करता सामाजिक बांधिलकी जपली. प्रत्येकाचे काम करून त्याला समाधान देण्याचा प्रयत्न केला. अडीअडचणीला धाऊन गेलो. अधिनस्त कर्मचाऱ्यांसोबत मैत्रीचे संबंध ठेवले. यामुळे सर्वांनी त्यांचे नेटवर्क मला शेअर केले. यातूनच माझे नेटर्वक वाढले आणि त्याचा फायदा मला गुन्ह्यांचा तपास करताना झाला. अविनाश चव्हाण याच्या हत्येच्या तपासात हेच नेटवर्क कामी आले. त्यानंतर चोवीस तासात गुन्हा उघड झाला.     
- सुधाकर बावकर, सहायक पोलिस निरीक्षक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com